दिग्दर्शक संदीप रेड्डीवांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ हा चित्रपट सध्या खुपच चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर रश्मिका मंदान्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत अनेक विक्रम मोडले आहेत. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून व प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत जवळपास २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशातच आता चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कलेक्शनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Animal Movie Box Office Collections)
रणबीर कपूरने ‘अॅनिमल’मधील त्याच्या अभिनयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. त्याचबरोबर बॉबी देओलनेही त्याच्या छोट्या भूमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘अॅनिमल’ने अवघ्या तीन दिवसांत २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी ६३.८ कोटींची कमाई केली होती. ‘अॅनिमल’चे पहिल्या दिवसाचे जागतिक कलेक्शन हे ११६ कोटी रुपये इतके होते. तसेच आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. शनिवारी या चित्रपटाने ६६.२७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्याचबरोबर रविवारी म्हणजे प्रदर्शनाच्या तिसर्या दिवशी ७१.४६ कोटींची भरघोस कमाई केली.
सोमवारी या चित्रपटाचा व्यवसाय हा इतर तीन दिवसांच्या तुलनेतन कमी झाला असल्याचे म्हटले जात आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘अॅनिमल’ने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी १२.८४ कोटी रुपये कमावले आहेत. ही आकडेवारी कायम राहिल्यास ‘अॅनिमल’चे चार दिवसांचे एकूण कलेक्शन आता २१४.३७ कोटी रुपये होऊ शकते असे म्हटले जात आहे.
दरम्यान, सध्या सर्वत्रच या चित्रपटाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. तरुणांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड आकर्षण पाहायला मिळत आहे. चित्रपटाची लोकप्रियता व मागणी वाढल्याने पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत चित्रपटाचे शोज लागले आहेत. आणि हे सगळे शोज हाऊसफूल आहेत. त्यामुळे लवकरच हा चित्रपट २५० ते ३०० कोटींचा टप्पा गाठेल असं म्हणायला हरकत नाही.