मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा व छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी (३ डिसेंबर) लागला. यांपैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या तीन राज्यात भाजपाला चांगलेच बहुमत मिळाले. त्यामुळे या निकालावर सध्या सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल कौतुक होत आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाडेनेदेखील या निकालावर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Megha Dhade On Instagram)
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत भाजपाला मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. तिने भाजपाच्या तीन राज्यातल्या विजयाबद्दल पोस्ट केली आहे. तिने एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “भारतीय जनता पार्टी झिंदाबाद… जय श्रीराम… तिन्ही राज्यातल्या जनतेचे मनापासून अभिनंदन… तिन्ही राज्यातल्या कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन… तेलंगणा राज्यातही भाजपाचा प्रवेश झाला… तिथे जोमाने काम करणार्या पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन…” असं म्हणत विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
यापुढे तिने असे म्हटले आहे की, “सनातन हिंदू धर्म संपवण्याचे भाष्य करणार्या पक्षांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली…सहकाऱ्यांनो आपणही अशीच मेहनत घेऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये मिळणार्या यशात, सांस्कृतिक प्रकोष्ठ म्हणून खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलू… जय हिंद…”. सध्या तिने शेअर केलेल्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.
दरम्यान, मेघा मनोरंजन या क्षेत्राबरोबरच राजकारण या क्षेत्रातदेखील कार्यरत आहे. याच वर्षी जून महिन्यात तिने भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेशची सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे. ‘बिग बॉस’ मराठीमुळे ही अभिनेत्री घराघरांत पोहोचली.