बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या ‘ॲनिमल’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. रणबीरचा हा आगामी चित्रपट त्याच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा फारच वेगळा असणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर आणि गाणी प्रदर्शित झाली असून त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आता चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहताना चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. (Ranbir Kapoor Animal movie trailer update)
येत्या १ डिसेंबरला रणबीरचा ‘ॲनिमल’ देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्याआधी चित्रपटाचे निर्माते सध्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याच्या नियोजनात व्यग्र आहे. काही ठिकाणी चित्रपटाचा ट्रेलर दिवाळीच्या कालावधीत म्हणजे १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान प्रदर्शित करणार असल्याचं म्हटलं जातं. तर काही ठिकाणी ही तारीख २३ नोव्हेंबरसुद्धा सांगण्यात येत आहे. तर सणासुदीच्या काळामुळे चित्रपटाचे ट्रेलर पुढे ढकलण्यात येत असल्याचं काही ठिकाणी बोललं जातं. मात्र, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, आता येत्या १८ नोव्हेंबरला ‘ॲनिमल’चा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा – रेव्ह पार्टी, विषारी साप अन् परदेशी मुली पुरवल्याचा आरोप, ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
तसंच चित्रपटाच्या लांबीबद्दल सोशल मीडियावर असंही म्हटलं जातं की, हा चित्रपट तब्बल ३ तासांपेक्षा अधिक कालावधीचा असणार आहे. काही ठिकाणी ३ तास १८ मिनिटे, तर काही ठिकाणी ३ तास १० मिनिटांचा कालावधी सांगितला जात आहे. पण दोन तासांपेक्षा अधिक काळ चित्रपटगृहात बसून चित्रपट पाहणे हे सध्याच्या काळात अधिक कठीण बनलं आहे. त्यामुळे या चित्रपटाला दोन मध्यांतर ठेवण्यात येणार असल्याची चर्चा रंगते. मात्र, ‘कोईमोई’ व ‘IMDB’ने या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. ‘IMDB’ने चित्रपटाची लांबी २ तास २६ मिनिटं दाखवण्यात आली आहे. मात्र निर्मात्यांनी याबाबतची अधिकृत माहिती समोर आणली नाही.
हे देखील वाचा – कंगना रणौत करणार राजकारणात एन्ट्री, द्वारकाधीशचे दर्शन घेत लोकसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत, म्हणाली, “भगवान श्री कृष्णाची…”
रणबीरच्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन ‘कबीर सिंह’ फेम दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी केलं आहे. हा चित्रपट रणबीरच्या संपूर्ण करिअरमधील सर्वात डार्क चित्रपट असून त्याला कधीही अशाप्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाली नसल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. या चित्रपटात रणबीरसह अभिनेत्री रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल आदी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.