बॉलिवूड आणि बिग बजेट चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच बॉलिवूडचा किंग म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजेच शाहरुख खानच्या चित्रपटासाठी तर प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. शाहरुख खानच्या ‘पठाण’, ‘जवान’ या बिग बजेट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांनी तर प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला. या चित्रपटांपाठोपाठ आता शाहरुखचा आणखी एक नवा कोरा चित्रपट लवकरच मोठया पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे. (Jyoti Subhash On Dunki)
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या चित्रपटाची शाहरुख खानच्या चित्रपटात भर पडली आहे. नुकताच शाहरुख खानचा ५८वा वाढदिवस झाला. त्याच्या चाहत्यांनी त्याचा हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने जगभरात साजरा केला. त्याच्या वाढदिवसादिवशी या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला. हा टिझर पाहून चाहत्यांनी आणि समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत.
किंग खानबरोबर ‘डंकी’ चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विकी कौशलची झलक पाहायला मिळाली. याशिवाय ‘डंकी’च्या टीझरमध्ये एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. टीझरमध्ये काही सेकंदासाठी त्यांची झलक दिसतेय त्यामुळे पटकन या अभिनेत्रीला ओळखणं कठीण होऊन बसलं आहे. शाहरुख खानच्या ‘डंकी’मध्ये अमृता सुभाषची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष या भूमिका साकारणार आहेत.
‘डंकी’च्या टीझरमध्ये शाहरुखच्या मित्राची आई त्याला आजीची शपथ घ्यायला सांगतेय. यावर ज्योती सुभाष “नालायकांनो प्रत्येक वेळी माझी शपथ का घेता? असं म्हणताना दिसत आहेत. आणि पुढे खोटी शपथ घेतल्याने त्यांचं निधन झालेलं ही पाहायला मिळतंय. हा संपूर्ण सीन टीझरमध्ये विनोदी पद्धतीने मांडण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्योती सुभाष मराठी कलाविश्वात सक्रिय आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. या आधी मराठीसह ज्योती सुभाष यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही महत्वपूर्ण भूमिका केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘गली बॉय’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होत होतं.