२२ जानेवारी रोजी अवघ्या देशभरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्यानगरीत जणू पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जात आहे. या सोहळ्याला देशभरातून मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच बॉलिवूड विश्वातूनदेखील अनेक कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. ‘रामायण’ मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविलही या सोहळ्यासाठी गेले होते.
अयोध्येत पार पडणाऱ्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अरुण गोविल हे दोन दिवस आधीच गेले असल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांच्या आगमनाचीदेखील जय्यत तयारी केली गेली होती. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. पण या भव्य व दिमाखदार सोहळ्यानंतर त्यांच्या पदरी निराशा पडली आली आहे. अभिनेते मंदिरात जाऊनदेखील त्यांना रामाचे दर्शन मिळाले नाही.
अरुण गोविल यांनी राम मंदीर उभारणी व त्यातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणासाठी आनंद व्यक्त केला. पण त्यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन मिळू शकले नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर अरुण गोविल यांना मंदिरात जाण्याची संधी मिळू शकली नाही. याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया देत असे म्हटले की, “मंदिर निर्माण होणे ही स्वप्नपूर्ती आहे.”
तसेच “या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणे हा एक अलौकिक अनुभव होता. यापुढे त्यांना दर्शनाबाबत विचारले असता अभिनेते म्हणाले, “मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने व्यवस्थित दर्शन होऊ शकले नाही.” त्यामुळे शांततापूर्वक दर्शन घेण्यासाठी पुन्हा एकदा मंदिरात येणार असल्याचेही अभिनेत्याने सांगितले.