भारत देश हा जात, धर्म, पंथ यांसारख्या अनेक विविधतेने नटलेला आहे आणि हेच भारत देशाचे आगळेवेगळे सौंदर्य आहे. स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनी एक देशातील एक भाग धर्माच्या नावाने देशाची फुट पाडण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याच भारतात एक समुदाय या भारताची एकजूट टिकवून ठेवण्यात प्रयत्न करत आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यातून भारताच्या या सौंदर्याचं दर्शन होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुस्लिम कुटुंब ‘रामायण’ मालिकेतील राम अर्थात अरुण गोविल यांच्यासह फोटो काढत आहेत.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेची क्रेझ आजही लोकांच्या डोक्यावर आहे. याशी संबंधित पात्रे जिथे जिथे दिसतात तिथे सर्वजण गर्दी करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊ लागतात. रामाची भूमिका साकारणारा अरुण गोविल असो की सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया असो. ९०च्या दशकात त्यांची प्रत्येक घरात पूजा केली जात होती आणि आताही काही ठिकाणी असे दृश्य पाहायला मिळते. हे दोघे जिथे जातात तिथे लोक त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतात.
सोशल मीडियावर अरुण गोविल यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती अरुण गोविल यांच्याबरोबर पत्नी व मुलांचे फोटो काढत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुक केलं आहे. “हाच खरा भारत आणि हेच खरे मुस्लिम आहेत. इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओचे कौतुक केले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सध्याचा नसून जुना आहे. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनदेखील चांगलीच पसंती मिळत आहे.