दिवंगत प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे आई-वडील बलकौर सिंह व चरण सिंह हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. सिद्धूची आई चरण कौर यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे. चिमुकल्याच्या येण्याने मुसेवाला कुटुंबात कमालीचे आनंदाचे वातावरण आहे. चरण कौर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी आयव्हीएफच्या माध्यमातून दुसऱ्या मुलाला जन्म दिला. पण आता दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्रास दिल्याप्रकरणी बलकौर सिंह यांनी पंजाब सरकारवर आरोप केले आहेत. (balkaur singh on punjab government )
सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईवडिलांनी मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या सर्व अफवा असल्याचे बोलले गेले. पण नंतर मात्र हे वृत्त खरं असल्याचे समोर आले. पण काही दिवसांनी जुळी मुलं होणार असल्याचे समोर आले मात्र तेव्हा सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. पण आता बाळाच्या येण्याने सर्व सुरळीत असतानाच बलकौर सिंह यांनी पंजाब सरकारकडून त्रास होत असल्याचे सांगितले आहे.
त्यांनी याबद्दल एक इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “वाहेगुरु यांच्या आशीर्वादाने आम्हाला आमचा मुलगा परत मिळाला आहे. पण सरकारकडून सकाळपासून मला त्रास होत आहे. ते वारंवार मुलाच्या जन्माच्या कागदपत्रांची मागणी करत आहेत”. पुढे ते म्हणाले की, “हा मुलगा आमचाच आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी ते माझी सतत विचारणा करत आहेत. मी सरकारला , मुख्यमंत्री भगवंत मान यांना विनंती करतो की सर्व उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. मी इथेच राहणारा आहे त्यामुळे नंतर मला तुम्ही जिथे बोलवाल तिथे मी येण्यासाठी तयार आहे”.
दरम्यान बलकौर सिंह यांना मुलगा झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते की, “शुभदीपला पाठिंबा देणाऱ्या लाखों लोकांच्या आशीर्वादाने देवाने त्याच्या लहान भावाला आमच्याकडे पाठवले आहे. देवाच्या आशीर्वादाने कुटुंब सुखरूप आहे आणि मी सर्व हितचिंतकांचे आभार मानतो”.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालावर २९ मे २०२२ रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच्या अचानक मृत्यूने सर्व चाहत्यांना धक्का बसला होता.