Punha Kartvya Aahe Promo : ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत काही दिवसांपासून नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत वसुंधरा व आकाश यांच्या नात्यात दुरावा आला असल्याचं पाहायला मिळत आहे. आकाश व वसुंधराच्या आयुष्यात काही दिवसांपासून सतत संकटे येत आहेत. वसुंधराचा पहिला नवरा शार्दुल पुन्हा एकदा वसुंधराच्या आयुष्यात आला आणि त्यामुळे आकाश व तिच्या नात्यात दुरावा आला आहे. शार्दूलच्या येण्याने आकाशने वसुंधरापासून घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे. इतकेच नाही तर आकाशने घटस्फोटांच्या कागदावरही सही केली आहे. अशातच मालिकेचा एक नवा प्रोमो झी मराठी वाहिनीवरुन समोर आला आहे. आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आकाश वसुंधराला त्याच्या घरी घेऊन आला असल्याचं दिसतंय. वसुंधराच्या येण्याने आकाशच्या कुटुंबीयांचा राग अनावर होतो. आकाशची आई जयश्री त्याला विचारते, “तू कसं काय हिला परत आणलंस?” आणि वसुंधराला म्हणते, “माझ्या मुलाचं वाटोळं करायची शपथ घेतली आहेस का तू?”. असं म्हणून जयश्री वसुंधरावर हात उगारते. तेव्हा आकाश तिला अडवतो. आकाशचे वडील म्हणतात, “परवा, तू डिव्होर्स पेपरवर सही केलीस ना? मग हे मध्येच काय?”.
वडिलांचं बोलणं ऐकल्यानंतर आकाश घटस्फोटाचे कागद सर्वांसमोर फाडतो. त्यानंतर आकाश देवासमोर वसुंधराच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि म्हणतो, “आपलं लग्न मोडलेलं नाहीये आणि ते कधीच मोडणार नाही”, असं सांगतो. “नातं पुन्हा जोडलं जाणार, आकाश वसुंधरा एकत्र येणार…!”, असं कॅप्शन देत झी मराठी वाहिनीच्या पेजवरुन हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. सदर प्रोमो पाहून नेटकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
“चला काहीतरी चांगलं दाखवत आहेत”, “आकाशभाऊ संपला विषय”, “आता भारी वाटेल”, अशा कमेंट करत मालिकेच्या बदलत्या कथानकाला पसंती दर्शविली आहे. मालिकेत वसुंधराने आकाशबरोबर लग्न करताना तिच्या पहिल्या पतीचे निधन झाल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच शार्दूलचं तिचा नवरा असल्याचं सत्य आकाश व त्याच्या कुटुंबासमोर आल्याचं पाहायला मिळालं. आता या प्रोमोनंतर मालिकेत कोणती नवं वळण येणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.