झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. एजे व लीला यांच्यामधील कुरबुरी असो किंवा लीला व तिच्या सुनांमधील छोटी-मोठी भांडणं असो, लीलाच्या वडिलांचं तिच्यावरील प्रेम असो किंवा आजीचं तिला समजावून घेणं असो; प्रेक्षकांना ही मालिका भुरळ घालते. वेगळ्या धाटणीचे कथानक आणि कलाकारांचा सहज अभिनय यांमुळे या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याबरोबरच नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. मालिकेत काही दिवसांपूर्वी लीलाच्या हातात जहागीरदारांच्या घराची जाबबदारी देण्यात आली आहे. (Navri Mile Hitlerla serial update)
आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून, लीलाला एजेची आठवण येत असल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, लीला तिच्या सुनांना जाब विचारत आहे. लीला लक्ष्मीला म्हणते, “तू डिलिव्हरीची वाट लावलीस आणि सरस्वती तू जेवणाची. मी सांगितलेली कामं कोणीही केली नाहीत.” तिचे हे बोलणे ऐकून दुर्गा म्हणते, “आम्ही तर आमची कामं केली आहेत. पण, तुम्ही ती विचार करून वाटली असती, तर ती पूर्णसुद्धा झाली असती.” त्यानंतर दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती निघून जातात. दुर्गाचे बोलणे ऐकून लीला नाराज होते. आजी तिथेच बसून घडलेला प्रकार पाहत असल्याचे दिसते.
त्या लीलाला म्हणतात, “चुका सगळ्यांच्या हातून होतात आणि चुकांमधूनच शिकायचं असतं”. प्रोमोमध्ये पुढे लीला तिच्या रूममध्ये आली असून, ती रडत आहे. रडत-रडत ती स्वत:शीच बोलताना म्हणते, “आज मी सगळी गडबड केली. एजे या ना लवकर”, तितक्यात तिला गाडीचा हॉर्न ऐकू येतो. एजे गाडीतून उतरत असल्याचे पाहायला मिळते. लीला आनंदात दरवाजा उघडते आणि एजेला मिठी मारते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “घडलेल्या प्रकारामुळे दु:खी झालेल्या लीलाला येतेय एजेंची आठवण…!” असं कॅप्शन देत हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामुळे आता एजे व लीला यांच्या नात्यात काय बदल होणार? लीला एजेंच्या प्रेमात पडणार का? आता एजे व लीलाच्या नवीन नात्याची सुरुवात होणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. त्यामुळे मालिकेतील आगामी नवीन भाग पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत हे नक्की.