कोणत्याही कलाकारासाठी तो ज्याच्यासमोर आपली कला सादर करत आहे, तो त्याच्यात रमून जाणे ही सन्मानाची बाब असते. बॉलिवूडमधील अशा अनेक लोकप्रिय गायकांना लाईव्ह ऐकण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशा काही लोकप्रिय गायकांपैकी एक गायक म्हणजे सोनू निगम. आपल्या सुरेल आवाजाने लोकांची मने जिंकणाऱ्या सोनू निगमने अलीकडेच राजस्थानमध्ये आयोजित ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील अनेक नेते आणि मंत्री सहभागी झाले होते. (Sonu Nigam displeasure on Rajasthan Chief Minister)
पण मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर काही मंत्र्यांनी मध्येच शो सोडून गेल्याने सोनू निगमने आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोनू निगमने या घटनेबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. सोनू निगमने जयपूरमध्ये आयोजित या कार्यक्रमातील या घटनेविषयी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने असं म्हटलं आहे की, “नमस्कार, मी नुकतेच जयपूरमधील एका कॉन्सर्टमधून येत आहे. ‘रायझिंग राजस्थान’ पूर्ण करून मी परत येत आहे. खूप चांगले लोक आले होते. तो एक मोठा शो होता. राजस्थानची शान वाढवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. मुख्यमंत्री साहेब आणि राजस्थानातील अनेक प्रसिद्ध लोक सहभागी झाले होते. पण, मी पाहिलं की शोच्या मध्यातच मुख्यमंत्री साहेब आणि इतर अनेक बडे लोक उठून निघून गेले आणि ते निघून जाताच मोठे प्रतिनिधीही निघून गेले”.
यापुढे गायक म्हणाला की, “त्यामुळे देशातील राजकारण्यांना माझे आवाहन आहे की, तुम्ही तुमच्या कलाकारांचा आदर करत नसाल तर बाहेरचे लोक काय करणार?. मी असं कुठेही पाहिलं नाही. अमेरिकेत कोणी कार्यक्रम करत असेल आणि राष्ट्राध्यक्ष बसला असेल तर तो मध्येच उठून जातो हे मी पाहिलेले नाही. जर त्याला जायचे असेल तर तो कळवतो, म्हणून माझी विनंती आहे की तुम्हाला उठून जायचे असेल तर मग तुम्ही येऊच नका किंवा असं मध्येच निघू नका. एखाद्या कलाकाराचा शो मध्येच सोडून जाणे अत्यंत अनादरकारक आणि देवी सरस्वती आणि कलेचा अपमान आहे”.
यापुढे सोनू निगमने असंही म्हटलं की, “हे सगळं माझ्या तेव्हा लक्षात आले नाही. पण शो संपल्यानंतर मला काही मॅसेज आले, ज्यात मला सांगण्यात आले की, तुम्ही असे शो करू नका. कारण कुणीही असंच उठून निघून गेला तर तो कलेचा अपमान आहे”. पुढे सोनू निगमने असंदेखील म्हटलं की, “मला माहित आहे की, तुम्ही सर्व व्यस्त आहात, तुम्हाला खूप काम आहे, म्हणून कृपया आधीच निघून जा”.सोनू निगमच्या या पोस्टवर चाहते आणि इंडस्ट्रीतील इतर लोक कमेंट करत आहेत . हे सांगण्याची क्षमता तुमच्यातच आहे, असे लोक म्हणत आहेत. काही लोक अगदी बरोबर लिहून त्याच्या मुद्द्याचे समर्थन करत आहेत.