‘नाट्यगृह’ हे एखाद्या कलाकारासाठी एका मंदिरासमान असते. कलाकार आपल्या रसिकांसमोर, प्रेक्षकांसमोर आपल्या कलेची उपासना करतो ते ठिकाण म्हणजे नाट्यगृह. पण कलाकारांच्या या मंदिरांची अर्थात नाट्यगृहांची अनास्था झालेली पहायला मिळत आहे. मुंबई असो वा पुणे… महाराष्ट्रातील प्रत्येक नाट्यगृहांमधील सुविधांची वानवा झालेली पाहायला मिळते आणि यावर आजवर अनेक कलाकारांनी आवाजही उठवला आहे. पण अद्याप परिस्थिती पूर्णत: बदलली असल्याचे दिसून येत नाही.
भरत जाधव, वैभव मांगले, मुक्ता बर्वे यांसह अनेक कलाकारांनी नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत व्यथा मांडली आहे. अशातच अभिनेत्री, निर्माती प्रिया बापट हिनेदेखील नाट्यगृहांच्या अस्वच्छतेबाबत भाष्य केले आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याद्वारे तिने नाटक पाहायला येणारे रसिक, प्रेक्षक यांना एक प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केलेल्या फोटोमध्ये नाट्यगृह दिसत असून नाट्यगृहात प्रेक्षकांनी केलेला कचरादेखील पाहायला मिळत आहे. प्रियाने शेयर केलेल्या या फोटोमध्ये पाण्याच्या बाटल्या, खाऊचे पॅकेट्स, चहाचे कप आणि अन्य कचराही पहायला मिळत आहे. याचाच फोटो काढत तिने चाहत्यांना प्रश्न विचरला आहे. यात तिने असे म्हटले आहे की, “नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. कचरा कचरापेटीत टाकावा, नाट्यगृहात नाही. ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार?”.
दरम्यान, नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज अशा अनेक माध्यमांतून अभिनय करत प्रियाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच प्रिया एक यशस्वी निर्मातीदेखील आहे. सध्या रंगभूमीवर तिचे ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक चालू आहे. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.