अभिनय क्षेत्रात अभिनेत्री तेजश्री प्रधानने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. फक्त मालिकांमध्येच नाही तर नाटक, चित्रपटांमधूनही तिने विविध भूमिका साकारत आपली वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर मांडली. त्यामुळे आजवर तिने साकारलेल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मालिकाविश्वात तर ती सगळ्यांची लाडकी सून म्हणून ओळखली जाते. नुकतीच ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मोठ्या ब्रेकनंतर तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इतकंच नव्हे तर ‘ठरलं तर मग’, ‘आई कुठे काय करते’ अशा लोकप्रिय मालिकांना ‘प्रेमाची गोष्ट’ने टीआरपीच्या शर्यतीत मागे टाकलं आहे. तेजश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकतंच तिने ‘आज थोडं व्यक्त व्हावसं वाटतं’ असं म्हणत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Tejashri Pradhan shared a post)
तिच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा पहिला प्रोमा प्रदर्शित झाल्यानंतर या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये बराच उत्साह दिसून आला होता. ४ सप्टेंबरपासून सूरू झालेल्या या मालिकाने पहिल्या आठवड्यातच टीआरपीच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. विशेष म्हणजे तेजश्री साकारत असलेलं मुक्ता हे पात्र प्रेक्षकांना बरीच पसंतीस पडत आहे. यानिमित्त तेजश्रीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली.
तेजश्री या पोस्टमध्ये लिहीते, “कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानू! तब्बल अडीच वर्षानंतर टेलिव्हिजनवर पुन्हा परतते. तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर यावं व पटकन म्हणावं की तू टीव्हीवर आल्यावर आम्हाला आमच्या घरातलीचं असल्यासारखी वाटतेस. तेच आपलं घरातलं माणूस अडीच वर्षानंतर परतलं व आपण त्याच्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून परतण्याची वाट पाहावी आणि घरी परतल्यानंतर त्या माणसाला तुमचे ते वाट पाहणारे डोळे बघून मग अगदी भरुन यावं. तसंच काहीसं माझ्या मनाचं झालं आहे. पहिल्या भागाला तुम्ही दिलेल्या प्रतिसादानंतर इतकी वर्ष श्रद्धा ठेवून सातत्याने काम करत तुमच्यासमोर येत राहिले. खूप वेळा पडले, धडपडले, पुन्हा उठले. आधाराला फक्त काम होतं. शाश्वती फक्त कामाची होती. त्याच कामाने इतकी वर्ष मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही धरुन ठेवलत”.
तेजश्री पुढे लिहिते, “आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं आहे की, मला जाणीव आहे सगळ्या गोष्टींची. तुमच्या आयुष्यातल्या त्या अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता. जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची व नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या त्या अश्रुच्या थेंबाचीही. जो कधी लक्ष्मीसाठी, कधी जान्हवीसाठी, कधी शुभ्रासाठी व आता मुक्तासाठी येत आहे. हिच जाणीव ठेवून पोटतिडकीने मी सातत्याने काम करते आहे. त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे या पुढेही देत राहील. पुन्हा एकदा मनापासून आभार! असेच कायम माझ्या पाठीशी राहा. बाकी #HappyLife आहेच”, असं कॅप्शन देत तिने प्रेक्षकांनी दिलेल्या आजवरच्या प्रेमाबद्दल व त्यांच्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. या पोस्टवर नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंटचा वर्षाव केला. एक नेटकऱ्याने ‘खूप खूप व अनंत काळासाठी फक्त तमच्यासाठीच प्रेम. तुम्ही सर्वोत्तम आहात. खूप प्रेम’, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘खूप शुभेच्छा. तुम्हाला देव भरभरून यश व समाधान देवो’, असं म्हणत तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.