कलाकार आणि ट्रोलिंग हे आता एक समीकरण झालं आहे. त्यातही हे ट्रोलिंग विशेषतः सेलिब्रिटी लोकांबाबत जास्त प्रमाणात घडतं. कोणता कलाकार कशामुळे ट्रोल होईल?, कोणत्या कलाकाराला कशामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागेल? याचा अंदाज लावणं हल्ली खूपच कठीण झालं आहे. काही कलाकार मंडळी या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. पण अनेक कलाकार मंडळी या ट्रोलर्सना उत्तर देण्यात अगदीच पटाईत असतात. त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला ते सडेतोड उत्तर देत असतात. यापैकीच एक म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे.
मुग्धा-प्रथमेश हे त्यांच्या गायनामुळे जितके चर्चेत असतात तितकेच ते सोशल मीडियावर ही सक्रिय असतात. दोघंही आपल्या चाहत्यांबरोबर दैनंदिन जीवनातील गोष्ट शेअर करत असतात. अशातच मुग्धाने शेअर केलेल्या एका पोस्टवर एका नेटकऱ्याने तिला ‘काकू’ म्हटलं आहे; ज्याला प्रथमेशने चोख उत्तर दिलं आहे. तसंच मुग्धानेही त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतेच मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले. लग्नाला ३ महिने पूर्ण होताच दोघांनी शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लग्नाला ३ महिने पूर्ण होताच दोघांनी गोव्यातील मंदिरात जात दर्शन घेतले आणि या दर्शनाचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र या फोटोवर एका नेटकऱ्याने “काकू झाली आहे. टिपिकल बाई.” अशी एक कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे.

नेटकऱ्याच्या या कमेंटवर मुग्धाने “स्तुती केल्याबद्दल धन्यवाद आजी” असं म्हणत उत्तर दिलं आहे. तर प्रथमेशनेही नेटकऱ्याच्या कमेंटला उत्तर देत तिचा चांगलाच समाचार घेतला आहे. प्रथमेशने तिच्या कमेंटवर “आमच्या कोकणात एक म्हण आहे, ‘माकड म्हणतं आपली लाल…’ असंच सांगितलं. बाकी मनात काही नाही आजी.” म्हणत तिला चोख उत्तर दिलं आहे.

तसेच आणखी एका नेटकऱ्याने “काय म्हणता काकू” अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरही मुग्धाने उत्तर देत असं म्हटलं आहे की, “मी एकदम मस्त अण्णा आजोबा”. दरम्यान, ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना मुग्धा-प्रथमेशने दिलेल्या चोख उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच या फोटोखाली मुग्धा-प्रथमेशच्या अनेक चाहत्यांनीही त्यांची बाजू घेत ट्रॉलर्सना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.