‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. सर्वसामान्य माणूस असो वा कलाकार मंडळी प्रत्येकजण हा हास्यजत्रेच्या प्रेमात आहे. यांत महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची निवेदक प्राजक्ता माळीही मागे राहिलेली नाही. प्राजक्ताने आजवर तिच्या अभिनय व सहज सुंदरतेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. नेहमीच ती काही ना काही पोस्ट करून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्राजक्ताचे लाखो चाहते दिवाने आहेत. (Prajakta Mali On Jyotirling Yatra)
प्राजक्ता जितकी बोल्ड, विचारी, सुसंस्कारी आहे तितकीच ती शिवभक्त आहे. महादेवावर विश्वास ठेवून त्याची पूजा अर्चा करण्यात ती कायमच तल्लीन असते. अनेक ठिकाणी ती मनसोक्त फिरतेच, शिवाय ती अनेकवेळा आश्रमात जाऊन मौनव्रत धारण करते. प्राजक्ता ‘आर्ट ऑफ लिविंग’च्या ऍडव्हान्स कोर्ससाठी त्रिवेणी आश्रमात गेलेली असून तिथं तिने मौनव्रत धारण केल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्राजक्ताची भगवंताला घेऊन केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
प्राजक्ताने यावेळी १२ ज्योतिर्लिंग यात्रेतील महाराष्ट्रातील परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. दर्शनावेळील काही फोटो शेअर करत तिने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे की, “चिदानंद रूपा “शिवोऽहम् शिवोऽहम्”, आजच्या सोमवारी संकल्प सोडला. येत्या वर्षात “१२ ज्योतिर्लिंग यात्रा” करणार. आज सुरूवात झाली – “महाराष्ट्रातल्या – परळी वैजनाथ” पासून. (ही यात्रा एकसंधपणे करता आली असती तर जास्त आनंद झाला असता, पण कामाच्या commitments मध्ये ते शक्य नाही. आपणांस तसे जमत असेल तर जरूर करावे. एकसंधपणे यात्रा करणे इष्ट.)”
प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या संकल्पाचे कौतुक केले आहे. प्राजक्ता नेहमीच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता प्राजक्ता १२ ज्योतिर्लिंगापैकी कोणत्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार हे पाहणं रंजक ठरेल.