टेलिव्हिजवरीवरील लोकप्रिय मालिका ‘सीआयडी’ ही मालिका माहीत नसणारे खूपच कमी प्रेक्षक असतील. या मालिकेने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र अचानक ही मालिका बंद करण्यात आली. ही मालिका बंद झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कोणतेही कारण नसताना का बंद केली हा प्रश्न आजही लोकांना पडत आहे. याबद्दल आता एसिपी प्रद्युम्नची भूमिका साकरणारे अभिनेते शिवाजी साटम यांनी भाष्य केले आहे. तसेच त्यांनी मालिका का बंद केली याचे कारणदेखील स्पष्ट केले आहे. त्यांच्या उत्तराने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आणि आश्चर्य व्यक्त केले आहे. (CID show close reason)
‘दया दरवाजा तोड दो’ हे वाक्य २० वर्ष प्रेक्षकांच्या कानावर पडलं. दया, अभिजीत, डॉ. साळुंखे, तारिका अशा अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र मध्येच ही मालिका बंद केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. याबद्दल शिवाजी यांनी ‘फ्रायडे टॉकीज’बरोबर बोलताना सांगितले. त्यांनी सांगितले की, “ही मालिका का बंद करत आहेत? याबद्दल आम्ही वारंवार वाहिनीला विचारणा केली. ‘सीआयडी’ व ‘केबीसी’ या दोन्ही कार्यक्रमांची टीआरपी सारखाच होती. पण कालांतराने TRP थोडा घसरला. पण हे तर कमी जास्त होतंच ना? कार्यक्रम बंद करण्याआधी वेळांमध्येदेखील बरेच बदल केले होते”.
पुढे त्यांनी सांगितले की, “आधी ही मालिका रात्री १० वाजता प्रसारित व्हायची. पण त्यांनी ती वेळ बदलून रात्री १०.३० केली. तसेच कधी कधी तर १०.४५ वाजता देखील दाखवला लागायचा. त्यामुळे दर्शक टीव्हीपासून दूर जाऊ लागले आणि मालिका बघण्याचे प्रमाण कमी झाले”. तसेच शिवाजी यांनी निर्माते व वाहिनीबद्दल सांगताना म्हणाले की, “वाहिनीला निर्मात्यांबद्दल काहीतरी समस्या होत्या आणि त्यामुळे ते वेळ बदलायचे. पण यामध्ये फक्त इमानदारी नाही तर आमची सगळ्यांची मैत्रीदेखील महत्त्वाची होती. आम्ही सगळे एकत्रच बाहेर पडलो.
दरम्यान ‘सीआयडी’ ही मालिका १९९८ मध्ये सुरु झाला आणि २०१८ मध्ये बंद करण्यात आला. यामध्ये शिवाजी यांच्याबरोबर आदित्य श्रीवास्तव, दयानंद शेट्टी, दिनेश फडणीस व नरेंद्र गुप्ता यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.