Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ चा ग्रँड फिनाले अगदी दणक्यात साजरा झालेला पाहायला मिळाला. या महाअंतिम सोहळ्यात रितेश देशमुखच्या होस्टिंगने अधिक रंगत आणली. यंदाच्या या पर्वाच्या ट्रॉफीवर गोलीगत फेम सूरज चव्हाणने नाव कोरले. यंदाची ही ट्रॉफी बारामतीत गेल्याने साऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचं दिसलं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून नाव कमावणाऱ्या सूरजचा हा प्रवास अगदीच वाखाणण्याजोगा होता. टिकटॉकच्या दुनियेत राजा माणूस असलेल्या या सूरजचा प्रवास साऱ्यांनीच पाहिला.
‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर सुरुवातीला हा गेम कसा खेळणार असा प्रश्न घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांनाही पडला असताना सूरजने सगळ्यांच्या मनावर राज्य करत मन जिंकली आणि मानाची ट्रॉफी सुद्धा पटकावली. नुकत्याच झालेल्या महाअंतिम सोहळ्यात सूरजच्या भावी आयुष्याबाबत केलेली एक मोठी घोषणा ऐकणं रंजक ठरलं. कलर्स मराठीचे सर्वेसर्वा केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या विजयानंतर आता आणखी एका चित्रपटाची घोषणा केली. कालच्या महाअंतिम सोहळ्यात या घोषणेत त्यांनी असं सांगितलं की, “‘बाईपण भारी देवा’नंतर मी पुढचा चित्रपट घेऊन येत आहे तो म्हणजे झापूक झुपूक’. ज्यात सूरज चव्हाण महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे”.
एकूणच सूरजला एका मोठ्या दिग्दर्शकाचा एक मोठा चित्रपट ऑफर करण्यात आला असल्याचे पाहायला मिळालं. आणि हा चित्रपट सूरजने कमावला असल्याने साऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. अभिनयाचं कोणतंही शिक्षण न घेता सूरजला एवढ्या मोठ्या बिग बजेट चित्रपटाची ऑफर मिळणं हे अनेकांना खटकलेलं दिसतंय. यावरुन मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने सूरजला टोमणाही मारलेला दिसला आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट करत त्याने सूरजचं कौतुक जरी केलं असलं तरी त्याने मारलेला हा टोमणा साऱ्यांच्या नजरेस आला. हा अभिनेता म्हणजेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम कपिल होनराव.
कपिलने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत, “१० वर्ष प्रयोगिक थेटर. ३.५ वर्ष टॉपची मालिका करुन, स्वतः ला अभिनेता म्हणून सिद्ध करुन, सिक्स पॅक abs, अभिनयावर काम करुन इतके रोज ऑडिशन देतोय. एक लीडचं ऑडिशन क्रॅक नाही होत. पण हा झापुक झुपुक बोलून BiggBoss ची ट्रॉफी आणि लीड फिल्म घेऊन गेला राव. अभिनंदन सूरज. झापुक झुपुक शुभेच्छा. गोलीगत शुभेच्छा भावा. खूप पुढे जा”, असं त्याने म्हटलं आहे.