‘लॉकअप’ फेम पूनम पांडेच्या निधनाची बातमी सगळीकडेच वाऱ्यासारखी पसरली. कर्करोगामुळे तिचं निधन झालं असल्याचं कळताच सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला. दोन दिवसांपूर्वी पूनम चित्रीकरण करत होती. मात्र अचानक कर्करोगामुळे निधन झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय तीन दिवसांपूर्वी ती गोव्यामध्ये होती. गोव्यामधील व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारेही शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये पूनम अगदी फिट दिसत होती. इतकंच नव्हे तर तिच्या निधनाची बातमी ऐकताच पूनमच्या बॉडीगर्डलाही मोठा धक्का बसला आहे.
पूनमचा बॉडीगार्ड अमिन खान गेल्या ११ वर्षांपासून तिच्याबरोबर काम करत होता. तिच्या निधनाची बातमी ऐकताच अमिनलाही धक्का बसला. ‘ईटाइम्स’शी अमिनने संवाद साधला. तेव्हा त्याने काही खुलासे केले. किंबहुना त्यालाही पूनमच्या निधनाबाबत माहित नव्हतं. तसेच तिला कर्करोग झाला असल्याचीही कल्पना त्याला नव्हती. अचानक पूनमच्या निधनामुळे त्यालाही मोठी धक्का बसला आहे.
अमिन म्हणाला, “३१ जानेवारीला मी तिच्याबरोबर होतो. रोहित वर्मासाठी आम्ही फिनिक्स मिलमध्ये फोटोशूटही केलं”. “पूनमला काही शारीरिक समस्या होती का?” असा प्रश्नही अमिनला विचारण्यात आला. तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला. तो म्हणाला, “पूनम अगदी फिट होती. तिने तिच्या आरोग्याबाबत काहीच सांगितलं नव्हतं. शिवाय मलाही तिच्याकडे पाहून आजाराबाबत पुसटशी कल्पनाही आली नाही”.
“नेमकं काय घडलं आहे? याबाबत तिची बहीण कधी सांगणार याची मी वाट पाहत आहे. आम्ही गोव्यामध्ये नुकतंच शूट केलं. ती स्वतःची काळजी स्वतः घेत होती. इतकंच नव्हे तर तिचा पर्सनल ट्रेनरही होता. पूनमने दारूचं सेवनही कमी केलं होतं. मी तिच्या घरीही गेलो होतो. पण तिथेही मला काही संशयास्पद जाणवलं नाही”. पूनमच्या अचानक जाण्याने अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. शिवाय तिचे कुटुंबीय नेमकं काय बोलणार? याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.