सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर उघडपणे भाष्य करणं आता सहज सोप झालं आहे. एखादा गंभीर विषय असल्यास काहीवेळा त्याची दखलही घेतली जाते. म्हणूनच हे माध्यम बहुदा अधिक प्रभावी झालं आहे. याचा वापर कलाकार मंडळीही अधिकाधिक करताना दिसत आहेत. आपले लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत हे लक्षात घेता, अनेक कलाकार आपल्या हातून चांगलं समाजकार्य घडावं या हेतूने सामाजिक विषय सोशल मीडियावर मांडतात. असंच काहीसं आता सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केलं आहे. सुकन्या यांनी सोलापूरमधील जत्रेतील एक भयावह व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.
अनेकदा मुंबई सारख्या शहरामध्ये लहान मुलांना पळवून नेणं असे प्रकार घडतात. कित्येकदा बातम्यांच्या माध्यमातून हे प्रकार कानी पडतात. याचंच एक भयावह दृश्य दाखवणारा व्हिडीओ सुकन्या यांनी समोर आणला आहे. हा व्हिडीओ सोलापूरमधील सिद्धरामेश्वर येथील यात्रेचा आहे. या यात्रेमध्ये अनेक मुलं पैसे कमावण्याच्या माध्यमातून आणण्यात आली होती. सुकन्या यांना हा व्हिडीओ एका whatsapp ग्रुपवर आला होता. तो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला.
या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती बोलत आहे की, “सोलापूर जिल्ह्याचे आराध्य दैवत सिद्धरामेश्वरच्या यात्रेला गेलो होतो. इथे अशी रंगवलेली ५०पेक्षा जास्त मुलं होती. कोणी त्यांच्याजवळ जाऊन फोटो काढत होतं तर कोणी त्यांना पैसे देत होतं. या रंगवलेल्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इतर मोठी मुलं ठेवण्यात आली होती. एका ठिकाणी तर दोन वर्षाची मुलगी उभी केली होती. ती बसण्यासाठी हट्ट करत होती. पण तिला बसू दिलं नाही. तिच्याजवळ असणारी मोठी मुलगी नशेत होती. तिला धुंदीचं काहीतरी औषध देण्यात आलं होतं. प्रचंड थंडीचे दिवस आहेत. तरीही ही लेकरं इथे उघडी बसली आहेत. प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. यावर काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे”.
हा व्हिडीओ शेअर करत सुकन्या यांनी म्हटलं की, “मला एका whatsapp ग्रुपवर हा व्हिडीओ आला आणि मी अस्वस्थ झाले. सदर मुले ही आपल्यापैकीच कोणाची तरी बेपत्ता झालेली मुलं असू शकतात. कुठलेच माय-बाप आपल्या मुला-मुलींना पैश्यांसाठी अशा पद्धतीने उघड्यावर सोडत नाहीत. हे सगळं संशयस्पद आहे. कोणी याची दखल घेईल का?”. सुकन्या यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ भयानक आहे, याची दखल घेतली पाहिजे असं अनेकांनी म्हटलं आहे.