भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्षांचा इतिहास आहे. या चित्रपटसृष्टीमध्ये अनेक दिग्गज कलकारांनी आपले योगदान दिले आहे.यामध्ये हिंदी,तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मराठी अशा अनेक भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत असतात. अनेक कलाकरांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे आजवर मनोरंजन केले आहे. यासाठी भारत सरकारतर्फे आशा कलाकारांचा सन्मान केला जातो. असेच एक महत्त्वाचे नाव म्हणजे वैजयंती माला. त्यांना नुकतेच ‘पद्म विभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (PM Narendra Modi on Actress vaijayanthi Mala )
वैजयंती माला या केवळ अभिनेत्रीच नाही तर नृत्यांगना,गायिका व निर्मात्यादेखील होत्या. वयाच्या १३व्या वर्षी १९४९ साली त्यांनी ‘वाकजाई’ या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर १९५२ मध्ये त्यांनी ‘बहार’या हिंदी चित्रपटामध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकामागोमाग एक बहारदार भूमिका सकरल्या. ‘देवदास’, ‘नागिन’, ‘ज्वेल थीफ’, ‘संगम’, ‘साधना’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. तसेच त्यांनी ‘हतै बजारे’ या बंगाली चित्रपटासाठी पार्श्वगायन केले असून एका तमिळ चित्रपटाच्या त्या सह-निर्मात्यादेखील होत्या. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या या योगदानासाठीच त्यांना कलक्षेत्रातील ‘पद्म विभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता आणि नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांनी चेन्नई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, “भारतीय चित्रपटसृष्टी जगतात त्यांच्या योगदानासाठी संपूर्ण देशभरात त्यांचा गौरव केला जात आहे”. तसेच पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “चेन्नईमध्ये वैजयंती माला यांना भेटून आनंद झाला. त्यांना या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्यांच्या दिलेल्या योगदानासाठी संपूर्ण देशभरात गौरविले जात आहे”.
वैजयंती माला यांनी वयाच्या ९०व्या वर्षी राम मंदिरामध्ये ‘रागसेवा’ या कार्यक्रमाध्ये नृत्य सादर केले होते. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून देशभरात त्यांचे कौतुक केले जात आहे. आता त्यांना ‘पद्म विभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वैजयंती माला यांच्या बरोबरच तामिळनाडूमधील आठ व्यक्तींची निवड झाली असून पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.