Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रिया- प्रीतम, पारू-आदित्य देवदर्शनाला गेलेले असतात. तेव्हा इकडे दामिनी पारूचं पितळ उघडं पाडण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन तिच्या पेटीतून आदित्यने दिलेली चिठ्ठी शोधून काढते. आदित्यने दिलेली चिट्ठी दामिनीच्या हाती लागते त्याच वेळेला सावित्री तिथे येते. तेव्हा दामिनी सावित्रीला सांगते की, ‘पारूबद्दलचा एक मोठा पुरावा माझ्या हाती लागलाय. खूप दिवसांपासून तुम्ही पारू आणि आदित्यचे हे नातं लपवून ठेवत होता. आज मी वहिनी समोर सगळं काही उघड करते’ असं म्हणते. त्यानंतर दामिनी अहिल्यादेवींच्या खोलीत जाते.
अहिल्यादेवी व श्रीकांत बोलत असतात तेव्हा अहिल्यादेवीं समोर आदित्यने दिलेली पारूसाठीची चिठ्ठी दामिनी वाचून दाखवते. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी म्हणतात की, ‘माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. तो आल्यावर आपण सविस्तर बोलूया’. दामिनी घराबाहेर उभी राहून त्यांची वाटच पाहत असते. पारू केव्हा येणार आणि ती अहिल्यादेवी समोर तिला केव्हा उभी करणार याची दामिनी वाट पाहत असते. त्याच वेळेला आदित्यची गाडी येते तेव्हा दामिनी पारूच्या हाताला धरुन तिला अहिल्यादेवीसमोर उभी करते आणि अहिल्यादेवींना सांगते की, आता तुम्ही पारूला विचारा की, त्यांचं काय सुरु आहे.
तर ती आदित्यला म्हणते, ‘मला तुझ्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये पण ही मुलगी तुला जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करतेय. त्यामुळे मी तुला वाचवतेय. माझं माझ्या कुटुंबाकडे विशेष लक्ष आहे’, असं सांगते. त्यानंतर सावित्री पारूला ‘आदित्य बाबांनी तुला दिलेली चिट्ठी प्रकरण नेमकं काय आहे ते सगळ्यांना सांग’, असं म्हणते. यावर पारू म्हणते, ‘मी या घराचं मीठ खाल्लं आहे त्यामुळं या घराचं नुकसान होईल असं काहीच केलेलं नाही’. तेव्हा आदित्य सांगतो, ‘हो मी पारुला चिठ्ठी दिली पण ती केवळ आमच्या मैत्रीपोटी होती. आमच्यात निखळ मैत्री नसू शकते का? एक मोलकरीण माझी मैत्रीण नसू शकते का? तुम्ही तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदला’, हे ऐकताच अहिल्यादेवी दामिनीला म्हणतात, ‘दामिनी तुला तुझं उत्तर मिळालं का?’. आणि दामिनीचा चांगलाच पाणउतारा करतात आणि तिला घालवून देतात.
घराबाहेर आल्यानंतर दामिनी पारुला गाठते आणि सांगते की, ‘या वेळेला तू वाचली आहेस पण आता तुझ्यावर माझी बारीक नजर असणार आहे. तू जे काही करशील त्याच्यावर माझी बारीक नजर असणार आहे. त्यामुळे तू आता सावध राहा’. तर सावित्री पारूला सावध राहण्याचा इशारा देते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.