Jahnavi Killekar Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे यंदाचं पर्व चांगलंच गाजलं. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. काहींना कौतुकाची थाप मिळाली तर काहींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अशातच घरातील सतत ट्रोल होणाऱ्या स्पर्धकांपैकी एक म्हणजे जान्हवी किल्लेकर. जान्हवी तिच्या स्वभावामुळे विशेष चर्चेत राहिली. सुरुवातीला अभिनेत्री तिच्या वागणुकीमुळे बरीच ट्रोल झाली. दिग्गज कलाकारांचा केलेल्या अपमानामुळे जान्हवी वादाच्या भोवऱ्यात अडकली. मात्र शेवटी घराबाहेर येताना ती टास्क क्वीन म्हणून बाहेर पडली. बाहेर आल्यानंतरही जान्हवी कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असलेली दिसतेय.
नुकतीच जान्हवीने ‘बिग बॉस’ विजेता सूरज चव्हाणची त्याच्या गावी बारामतीला जाऊन भेट घेतली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबत त्यांनी अपडेट दिली. यानंतर आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने प्रेक्षकांना विनंती केली असल्याचं समोर आलं आहे. जान्हवीने ‘बिग बॉस’मध्ये घातलेल्या कपड्यांचा जान्हवी लिलाव करणार अशी चर्चा होती. या चर्चेवर आता अभिनेत्रीने मौन सोडलं असून पूर्णविराम दिला आहे.
जान्हवीने व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “हॅलो, व्हिडीओ बनवण्यामागचं कारण असं आहे की, आताच मी एक अफवा वाचली. अनेकजण मला फोन करुनही याबाबत विचारत आहेत. सुरुवातीला मला यावर विश्वास बसत नव्हता पण आता मी स्वतःहून मी ते वाचलं. जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात घातलेल्या कपड्यांचा लिलाव करणार आहे. जान्हवीने ‘बिग बॉस’च्या घरात घेतलेले १०० ड्रेस व ४० नाईट ड्रेसचे ती लिलाव करणार आहे. या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे. मी १०० ड्रेस घेतले आहेत ते मी वापरेन त्याचा मी लिलाव का करेन?”.
आणखी वाचा – चारुलता व चारुहासच्या लग्नासाठी अक्षराची धडपड, मात्र अधिपतीची नाराजी, दोघांमध्ये सुरु झाले वाद
पुढे ती म्हणाली की, “कृपया मी सगळ्यांना विनंती करेन की अशा अफवा उगीच पसरवू नका. मला कोणतेही माझे कपडे विकायचे नाही आणि ते मुळात विकण्यासारखे नाही आहेत. ते माझे कपडे आहेत त्यामुळे माझे कपडे मी का विकू?. ते कपडे खूप महागडे नाही आहेत. त्यामुळे विनंती आहे की, उगीच काहीही अफवा पसरवू नका”.