Ankita Walavalkar Angry : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर घराघरांत पोहोचली. अंकिताने तिच्या खेळाने आणि बोलण्याने ‘बिग बॉस’च्या घरात हवा केली. कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर तिच्या वैयक्तिक कारणामुळेही बरेचदा चर्चेत राहिली. ‘बिग बॉस’च्या घरात असताना अंकिताला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच नव्हे तर घराबाहेर आल्यानंतरही अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंकिताने वेळोवेळी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केलेली पाहायला मिळाली. अंकिता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरुन नेहमीच ती काही ना काही अपडेट शेअर करताना दिसते. सध्या अंकिता तिच्या गावी म्हणजेच कोकणात वेळ घालवताना दिसतेय.
काही दिवसांपूर्वीच अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाहीर प्रेमाची कबुली दिली. अंकिता कुणाल भगतसह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये अंकिताला डिवचलेलं पाहायला मिळतंय. यावर सडेतोड उत्तर देत अंकिताने नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. थेट स्टोरीला ती पोस्ट शेअर करत तिने “कृपया अशा प्रोफाइलची तक्रार करा आणि मुलीला वाचवा”, असे आवाहन केले आहे.
अंकिताने एका पेजचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताचा अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्याबाबत बोललं आहे. “हिचा व्हिडीओ पाहिला आहे का कोणी?, व्हिडीओसाठी कमेंट करा व्हिडीओ मिळून जाईल”, असं म्हणत एका पेजने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून अंकिताचा पारा चढला असून तिने या पोस्टवर कमेंट केलेली पाहायला मिळतेय. अंकिताने या पोस्टवर कमेंट करत असं म्हटलं आहे की, “फक्त व्हिडीओ पाहिला का असा रील टाकलास. त्याला बघ किती व्ह्यूज आहेत. चुकून जर तुझा पत्ता कळला ना घरात येऊन तुडवेन असा की तुझा व्हिडीओ तू बघण्या लायक राहणार नाही. हे असले फेक चाळे बंद करा”. यानंतर अंकिताने थेट स्टोरीला स्क्रीनशॉट शेअर करत नाव खराब करणाऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
अंकिताने स्टोरी पोस्ट करत असं म्हटलं की, “कृपया अशा प्रोफाइलची तक्रार करा आणि मुलीला वाचवा”. एकूणच अंकिताने नेटकऱ्यांना आवाहन करत अशा चारित्र्यावर शंका घेणाऱ्या, धमकावणाऱ्या व्हिडीओला आळा घालण्यास सांगितलं आहे.