बॉलिवूडमधील काही लोकप्रिय गायिकांपैकी एक म्हणजे नेहा कक्कर. अनेक हिट्स गाणी गात नेहा सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातली ताईत बनली आहे. आपल्या सुरेल आवाजाने व गाण्यांनी नेहाने तिच्या अनेक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. आपल्या गाण्यांनी चर्चेत राहणारी नेहा अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. अशातच नुकतंच एका मुलाखतीत नेहाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
नेहाच्या लग्नानंतर तिच्याबद्दल सोशल मीडियाद्वारे अनेक अफवा पसरल्याचे पाहायला मिळाले. या काळात कधी तिच्या घटस्फोटाबद्दल चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले, तर कधी तिच्या गरोदरपणाच्या. या साऱ्यावर आता स्वत: गायिकेने भाष्य केले आहे. ‘एंटरटेन्मेंट टाईम्स’शी बोलताना नेहा असं म्हणाली की, “मी लग्न केल्यापासून माझ्याबद्दल फक्त दोनचं अफवा पसरल्या. त्यापैकी एक म्हणजे मी गरोदरपणाबद्दल आणि दुसरी म्हणजे माझ्या घटस्फोटाबदल. अशा अफवा ऐकून खूप वाईट वाटतं. उगाच चर्चा करण्यासाठी लोक काहीही बोलतात. पण मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करते. कारण सत्य काय आहे हे फक्त मला माहिती आहे”.
नेहाने २०२२ मध्ये ‘इंडियन आयडल’मध्ये परिक्षकाची भूमिका स्वीकारली होती. यानंतर तिने काही लाईव्ह गाण्यांच्या कार्यक्रमांमधून रासी श्रोत्यांचे मनोरंजन केले. त्यामुळे ती या काळात टीव्हीपासून काही काळ लांब राहिली. याबद्दल तिने असं म्हटलं की, “मधल्या काळातला हा ब्रेक माझ्यासाठी महत्त्वाचा होता. कारण सतत शूटिंग करुन मी शारीरिक व मानसिकदृष्ट्या खूपच थकले होते. एक क्षण असा आला की काही गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर जावू लागल्या. त्यामुळे मग मी ब्रेक घेतला. मी लहानपणापासून या क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे माझ्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मला हे करावं लागलं. पण मी आता पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी तयार आहे”.
दरम्यान, २०२१ मध्ये नेहाने रोहनप्रीत बरोबर लग्न केले. त्यामुळे लग्नानंतर तिचे लक्ष आपल्या कामावरुन कुटुंबाकडे अधिक वळले का? असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत तिने असं म्हटलं की, “हो. काही काळ मी माझ्या कुटुंबाकडे व नवऱ्याकडे लक्ष दिले. पण आता मी पुन्हा माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. माझ्या लग्नाला ३ वर्ष झाली असून मी माझ्या नवऱ्याला हवा असलेला वेळ दिला आहे. त्यामुळे आता मी पुन्हा माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचा विचार केला आहे”.