सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असताना प्रथमेश परब, तितीक्षा तावडेच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली. यापाठोपाठ आता अभिनेत्री पूजा सावंतही लग्नबंधनात अडकणार आहे. पूजाच्या लग्नापूर्वीच्या विधींचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आलेले पाहायला मिळाले. मेहंदी, संगीत, हळदीच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. पूजा सिद्धेश चव्हाणसह लग्नबंधनात अडकणार आहे. पूजा व सिद्धेशच्या रोमँटिक फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. अशातच पूजाच्या हळदीतल्या एका व्हिडीओने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. (Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding)
अगदी थाटामाटात पूजा सावंतच्या हळदीचा कार्यक्रम पार पडल्याचं पाहायला मिळालं. जवळचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र-परिवाराच्या उपस्थितीत हा हळदी समारंभ अगदी धूमधडाक्यात साजरा पार पडला. पूजाला हळद लावताना ती थोडीशी भावुक झालेली ही पाहायला मिळाली. यावेळी अभिनेत्रीचा हळदी स्पेशल लूक सर्वांच्या पसंतीस पडला. पूजाने व सिद्धेशने सारख्याच रंगाचे म्हणजेच जांभळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर इतर मंडळींनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. पूजाच्या हातातील हिरवा चुडा आणि केसात माळलेल्या पांढऱ्या रंगाच्या गजऱ्याने तिचं सौंदर्य आणखीनच फुलून आलं होतं. पूजाने लेहेंगा-चोळी परिधान केली होती तर सिद्धेश जांभळ्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये पाहायला मिळाला.
आणखी वाचा – अनन्या पांडे होणार मावशी, बहिणीने व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज
पूजाच्या हळदीतील लक्षणीय बाब म्हणजे हळद लावताना जपलेली पारंपरिक प्रथा. कोकणात हळद लावताना खास पारंपरिक अंदाजात गाणी गायली जातात. ही गाणी पूजाला हळद लावतानाही गायली गेली. मुंबईत जरी हा हळदीचा कार्यक्रम मॉडर्न अंदाजात पार पडला असला तरी त्यांनी मराठमोळी परंपरा जपली. पूजाच्या हळदीतील ही पारंपरिक गाणी पाहून अनेकांनी या जपलेल्या मराठमोळ्या परंपरेचं कौतुक केलं.
पूजाच्या हळदी समारंभात तुफान डान्स करत सगळ्यांनी खूप मजा केली. यावेळी अभिनेत्रीने खास ‘बुमरो बुमरो’ या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. शिवाय अभिनेत्रीचा नवऱ्याबरोबरचा कपल डान्सही चर्चेत राहिला. इतकंच नव्हे तर पूजाने तिच्या लाडक्या बहिणीसह ठेका धरलेला पाहायला मिळाला. थाटामाटात साजरी झालेल्या या हळदीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.