छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या शोमुळे अनेक विनोदी कलाकार प्रसिद्धीझोतात आले, त्यापैकी एक म्हणजे अभिनेता श्यामसुंदर राजपूत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून “खानदेशचा सपूत श्यामसुंदर राजपूत अशी आपली एक वेगळी ओळख निर्माण करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र श्याम हे अभिनेते होण्याअगोदर इंजिनीअर होते. त्यामुळे इंजिनीअर क्षेत्र सोडून अचानक अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्यांना फार संघर्ष करावा लागला.
‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात श्याम सुंदर राजपूत यांनी आपल्या या संघर्षाबद्दल सांगितले आहे. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “इंजिनीअर झाल्यानंतर अचानक मनोरंजन क्षेत्रात येणे हा भयानक निर्णय होता. ज्या मुलाने याआधी कुठेही अभिनय केला नाही, कुठेही काम केले नाही किंवा जो मुलगा स्टेजवरही गेलेला नाही. त्यासाठी हा निर्णय खूपच धाडसी होता. एके रात्री मला माझ्या आईने रात्री २ वाजेपर्यंत समजावले, पण तिला कळलं हा काही ऐकणार नाही. त्यानंतर माझ्या आईने, भावाने आणि बायकोने मला खूपच पाठिंबा दिला. कधी काम आवडलं नाही तर त्यांनी मला तू यापेक्षा चांगलं काम करू शकला असता असा सल्ला दिला. पण त्यांनी मला हे काम करु नको असं कधीही सांगितलं नाही”.
यापुढे त्यांनी एक किस्सा सांगताना असं म्हटलं की, “काही काम केल्यानंतर मधल्या काळात माझ्याकडे काही काम नव्हतं. तेव्हा माझ्या खिशात फक्त १०० रुपये होते. तेव्हा मी मुंबईत एकटा होतो. माझ्याकडे पैसे होते, पण मी ते काही मित्रांना उधार दिले होते आणि मित्रांनी त्या त्या वेळेत ते पैसे परत न् दिल्याने माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते. मग एकेदिवशी मला ‘मस्त चाललंय आमचं’साठी फोन आला. तेव्हा मला त्यात काम केल्याचे दहा हजार व सहाय्यक म्हणून काम केल्याचे दहा हजार मिळाले होते. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला होता”.
दरम्यान, श्याम सुंदर राजपूत यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या आधी अनेक विनोदी कार्यक्रमांमधून काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक चित्रपट व कार्यक्रमांसाठी सहाय्यक म्हणून कामही केले आहे. त्यांच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक भूमिका गाजत असून प्रेक्षकांनाही या भूमिका विशेष आवडतात.