बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या अतरंगी वागण्यामुळे सतत चर्चेत असते. बेधडक वक्तव्य, अतरंगी पोशाख यामुळे राखीची सोशल मीडियावर अधिक चलती आहे. नुकतेच तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुरानीने दुसरं लग्न केल्याने त्याच्या गंभीर आरोप करताना राखी दिसली. पण आता ती तिच्या पतीमुळे किंवा तिच्या विचित्र वागण्यामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. राखीने माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडली आहे. (rakhi sawant vs sameer wankhede )
‘बिग बॉस १४’ मुळे अधिक चर्चेत आलेली राखी व तिचे वकील अली काशिफ खान यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. हा दावा माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केला असून त्यामध्ये ११ लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. पण हा मानहानीचा दावा नक्की का करण्यात आला हे जाणून घेऊया.
समीर यांनी आपली तक्रार दाखल करत राखी व अली काशिफ खान यांच्याविरोधात त्यांची प्रतिमा खराब करुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. पण समीर यांच्या याचिकेवर राखीच्या वकिलांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, “कायद्यानुसार जेव्हा जनतेच्या भल्यासाठी काही खरं बोललं जातं तेव्हा ती मानहानी ठरू शकत नाही. आयपीसी कलम ४९९ अंतर्गत ‘पब्लिक कंडक्ट ऑफ पब्लिक सर्व्हंट’ हा अपवाद आहे म्हणजे यामध्ये एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या सार्वजनिक कामातील त्यांच्या वागण्याबद्दल किंवा त्याच्या प्रतिमेबद्दल एखादे मत सांगितले तर त्याला मानहानी म्हणता येत नाही”.
पुढे ते म्हणाले की, “याचे योग्य ते उत्तर दिले जाईल. जर समीर यांनी त्यांचे बोलणे खरं करुन दाखवलं तर मी त्यांना ११.०१ लाख रुपये देईन”. यावर अद्याप राखीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान हे प्रकरण अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान संबंधित आहे. आर्यनला एनसीबीने ड्रग्स केसमध्ये अटक केली होती त्यावेळी राखीने आर्यनच्या बाजूने अनेक व्हिडीओ सोशाल मीडियावर शेअर केले होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये तिने म्हंटले होते की, “जर तुम्ही सिंह असाल तर सिंहाबरोबर लढा. गिधाड बनून मुलांवर हल्ले करु नका”, तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान या प्रकरणाचा निकाल काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष आहे.





