नितेश तिवारीच्या ‘रामायण’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट चित्रपटातील कलाकारांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात प्रभू रामाची मुख्य भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरची निवड करण्यात आली आहे, तर अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत असणार असल्याचं समोर आलं आहे. तर अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशातच आता, ‘ETimes’ च्या अहवालातून असे समोर आले आहे की, निर्मात्यांना अखेर त्यांचा लक्ष्मण सापडला असून ही भूमिका टीव्ही अभिनेता रवी दुबे साकारणार आहे. (Ramayan Movie Cast)
रवी दुबे हा टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता असून तो एक उत्तम निर्माता आहे. ‘जमाई राजा’ या मालिकेतून अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली. रणबीर, सई व यश व्यतिरिक्त, निर्मात्यांनी चित्रपटात विभीषणची भूमिका साकारण्यासाठी हरमन बावेजा याची निवड केली आहे. चित्रपटाचं चित्रीकरण एप्रिलपासून सुरु होणार असून फिल्मसिटी मुंबई येथे सुरु होणार असल्याची चर्चा आहे.
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, अरुण गोविल यांना रणबीरने प्रभू रामाची भूमिका केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अभिनेता रामायणातील अरुण गोविलशी त्याची तुलना करु शकतो का असेही यावेळी विचारण्यात आले. यावर उत्तर देत अरुण गोविल म्हणाले की, “रणबीर त्याची प्रभू राम ही व्यक्तिरेखा चमकदारपणे साकारु शकेल की नाही हे येणारा काळच सांगेल”.
अरुण गोविलने रणबीरच्या संगोपनावर भाष्य केले आणि रणबीर कौतुकास्पद कामगिरी करण्यास सक्षम आहे आणि तो निश्चितपणे स्वतःला सिद्ध करेल, असा विश्वास व्यक्त केला.