मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडत आहेत. मराठी प्रेक्षकांसह हिंदी प्रेक्षकवर्गालाही कलाकार आपलसं करून घेतात. असाच मराठमोळा अभिनेता, दिगदर्शक, लेखक चिन्मय मांडलेकरने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. चिन्मयने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये त्याच्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अभिनयासह दिग्दर्शन आणि उत्तम लिखाण करत त्याने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. ‘वादळवाट’ या मराठी मालिकेचा लेखक म्हणून चिन्मयची सुरवात झाली. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तू तिथे मी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत चिन्मय झळकला होता.(actor chinmay mandlekar)
चिन्मयने मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ या चित्रपटातही चिन्मय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळाला. त्यामुळे प्रेक्षक आणि चाहते चिन्मयकडे तेवढ्याच आदराने पाहतात. बरेचदा कलाकाराला कुटुंबाला वेळ देणं शक्य होत नाही. एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते त्याचप्रमाणे चिन्मयलासुद्धा नेहाची (पत्नी) खंबीर साथ मिळाली. संजय मोने यांच्या ‘कानाला खडा’ या कार्यक्रमात चिन्मयने हजेरी लावली होती. त्याच कार्यक्रमात चिन्मयची पत्नी नेहालाही बोलवण्यात आलं होत.
नेहाने चिन्मयच्या स्वभावाबाबत अनेक खुलासे केले. चिन्मयच्या प्रेमात कशी पडलीस? असं नेहाला विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, “मी त्याच्या लिखाणाच्या प्रेमात पडले. माझ्या कुटुंबात त्याने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक केलं जातं.” नेहा ही गृहिणी आहेच त्याचबरोबर उत्तम wild life photographer आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमात चिन्मय कोणत्या प्राण्यासारखा वाटतो असं नेहाला विचारलं गेलं. त्यावर नेहा म्हणाली, ”तो शांत डॉल्फिन सारखा आहे. कुणालाही त्रास न देता तो आपलं आपलं पोहत असतो” असं गंमतीशीर उत्तर दिलं.”
”चिन्मय खूप विसराळू आहे” असं या कार्यक्रमात नेहा म्हणाली. आजवर दोघांनीही एकमेकांना खंबीर साथ देत त्यांचा सुखी संसार सुरु आहे. कामाबरोबरच तो त्याच्या कुटुंबालाही वेळ देत असतो. ‘द काश्मीर फाईल्स ‘ ‘गांधी गोडसे’ या हिंदी चित्रपटातील भूमिकांसह चिन्मयच्या ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.