कलर्स मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असतात. यापैकीच एक मालिका म्हणजे ‘रमा राघव’. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अल्पावधीतच ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्व्ल स्थानावर पोहोचली. मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना चाहत्यांसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ‘रमा राघव’ मालिकेतील एका अभिनेत्रीची एक्झिट झाली असल्याचं, समोर आलं आहे. (Marathi Actress On Rama Raghav)
‘रमा राघव’ मालिकेतील एका अभिनेत्रीने वैयक्तिक कारणामुळे मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मालिकेत पूजा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अर्चना निपाणकर हिने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तर त्या जागी मराठमोळी अभिनेत्री श्वेता अंबिकर झळकणार असल्याचं समोर आलं आहे. ‘रमा राघव’ मालिकेतून अर्चना निपाणकर हिने प्रेक्षकांचा निरोप घेतला असल्याची बातमी तिने स्वतः एक व्हिडीओ शेअर करत दिली आहे. तसेच या व्हिडिओमधून तिने मालिकेतून निरोप घेण्याचं कारणही स्पष्ट केलं आहे.
अर्चनाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती म्हणाली आहे की, “आतापर्यंत तुम्ही मला ‘रमा राघव’ मालिकेत पूजाची भूमिका साकारताना पाहत होता. तुम्ही सगळ्यांनीच या भूमिकेवर प्रेम केलं. माझ्या कामाच खूप कौतुक केलं. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. पण दुर्दैवाने माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला ही मालिका सोडावी लागतं आहे. अर्थात या सगळ्यात कलर्स मराठीची टीम, माझं प्रोडक्शन क्रिएटीव्ह ट्रान्समीडिया आणि माझ्या मालिकेची संपूर्ण टीम या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं. तसेच खूप मदत केल्यामुळे अर्थात हे सगळं शक्य झालंय.”
“पण आनंदाची बातमी अशी आहे की, पूजाची भूमिका आता अत्यंत गुणी आणि छान अभिनेत्री श्वेता अंबिकर साकारणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, जसं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, पूजावर प्रेम केलं, तसंच तुम्ही नवीन पूजावर म्हणजे श्वेता अंबिकरवर सुद्धा प्रेम कराल आणि तिला आपलंस करून घ्याल, असा माझा विश्वास आहे. आतापर्यंत तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल, माझं जे इतके दिवस तुम्ही कौतुक केलं त्या सगळ्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद,” असं अर्चना म्हणाली.
अर्चनाच्या मालिकेतून निरोप घेण्याच्या अचानक निर्णयामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. “अरे बापरे अर्चना मॅम मी तर फक्त तुमच्यासाठी ही मालिका बघायचो. लवकरच नवीन मालिकेत अथवा चित्रपटामध्ये वाट बघू.” अशी कमेंट करत अर्चनाला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.