सध्या सर्वत्र नाटकाचा माहोल पाहायला मिळतोय. प्रेक्षक चित्रपटगृहांबरोबरच नाट्यगृहांकडे वळलेले पाहायला मिळत आहेत. अशातच ‘सफरचंद’ या नाटकाची विशेष चर्चा सुरु असलेली पाहायला मिळतेय. फिरत्या रंगमंचाचे हुबेहूब दर्शन या नाटकांतून घडतेय. या नाटकाच्या कथानकाबरोबरचं नाटकाचा फिरता मंच या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने या नाटकाला अनुसरून केलेली पोस्ट सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Yogesh Sohoni On Marathi Drama)
‘सफरचंद’ हे नाटक पाहिल्यानंतर अभिनेता योगेश सोहोनी याने आव्हानात्मक केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. नाटकाचं पोस्टर शेअर करत योगेश म्हणाला, “हार्दिक नाही तर आर्थिक शुभेच्छा जास्त महत्वाची! नाटकाला हार्दिक शुभेच्छा सगळेच देतात पण तिकीट काढुन नाटक पाहायला जाऊन आर्थिक शुभेच्छा देणं जास्त महत्त्वाचं. तर नाटकाचे प्रयोग सुरू राहतील. असंच एक अप्रतिम नाटक आज पाहिलं ‘सफरचंद’.
यापुढे नाटकाची स्तुती करत योगेशने भरभरून लिहिलं. त्याने लिहिलं की, “अभिनय, लेखन, दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना निव्वळ अप्रतिम. इतक्या वर्षांनी स्टेजवर फिरत्या रंगमंचाचा वापर केला आहे आणि तेही एक नाही तर दोन फिरते रंगमंच. काश्मीरमध्ये होणारा Snow Fall ज्या पद्धतीने दाखवला आहे त्याने डोळ्याचे पारणे फिटते. झेलम नदीत चालणारी होडी, त्याच्या आजूबाजूला थंडीने असणारे धुके याने जे वातावरण तयार होते, त्याने नाटक पाहताना खरंच आपण काश्मीरच्या एका लहानश्या गावात असल्याचा भास होतो. नाटक हे आभासी आहे असं आपण म्हणतो पण हे नाटक खरंच त्याला अपवाद आहे”.
“घराचा सेट आणि सफरचंदाची झाडं असलेला फिरता रंगमंच, आजुबाजूचा परिसर, सतत होणाऱ्या लहान मोठ्या युद्धाने तयार होणारे वातावरण, सूर्योदय-सूर्यास्त यामुळे प्रकाश योजनेत झालेला बदल, पार्श्वसंगीत सगळंच अफाट आहे, तसंच नाटकातील विषय ज्या पद्धतीने लोकांसमोर मांडला त्यासाठी दिग्दर्शक राजेश जोशी यांचे विशेष अभिनंदन. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत या सगळ्या नाटकात एकही Black Out नाही आणि अशा या नाटकाच्या प्रवासाची Roller Coaster Ride प्रेक्षकांना दाखवणाऱ्या कलाकारांना विशेषतः शंतनू मोघे, शर्मिला शिंदे, प्रमोद शेलार, संजय जमखेंडी याना हॅट्स ऑफ, आणि त्यांच्याबरोबर असलेले अमीर तडवळकर, अक्षय वर्तक, रुपेश खरे, राज आर्यन या साहाय्यक कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे ही भट्टी कमाल जमली आहे. पण ही भट्टी जमण्यासाठी आणि ती कायम टिकण्यासाठी तितक्याच ताकदीचे निर्माते लागतात”.
“कोणतीही कलाकृती स्वतःच एक नशीब घेऊन जन्माला येते अस म्हणतात, पण ते भविष्य तिकीट काढून, नाटक पाहायला जाऊन, उज्वल करणं हे प्रेक्षकांच्या हातात असतं. कोड मंत्र यासारख्या भव्य-दिव्य नाटकानंर पुन्हा एकदा तितकंच खर्चिक नाटक उभं करणे हे सफरचंद खाण्याइतक सोपं नाही. सगळ्या प्रेक्षकांना एक नम्र विनंती की हे नाटक जवळच्या नाट्यगृहात जाऊन नक्की बघा आणि एखादा भव्य सिनेमा पाहिल्याचा अनुभव घ्या. नाटकाच्या संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा. जगात सफरचंदाच्या हजारो जाती आहेत असं म्हणतात त्याचप्रमाणे तुमच्या नाटकचे हजारो प्रयोग हाऊसफुल्ल होवोत हीच नटराजाच्या चरणी प्रार्थना”. असे म्हणत त्याने नाटक पाहण्याची विनंती करून आर्थिक हातभार लावत नाटकांची उंची अधिकाधिक वाढवण्याचं आवाहन केलं आहे”.