Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा अजूनही सुरुच आहे. २१ डिसेंबरला कोकणात मुग्धा-प्रथमेशचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. त्यांच्या लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नापूर्वीचे विधी ते अगदी लग्न कसं पार पडलं याबाबत प्रत्येक माहिती मुग्धा-प्रथमेशच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे मिळाली. शिवाय या दोघांनीही काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त केलं. लग्नानंतर सासरी मुग्धाचं अगदी जंगी स्वागत करण्यात आलं. याचाच व्हिडीओ मुग्धा-प्रथमेशने आता इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचीच सध्या सर्वाधिक चर्चा रंगत आहे.
मुग्धाचं सासरच्या मंडळींनी अगदी धमाकेदार स्वागत केलं. फुलांची सजावट, अंगणात नातेवाईक मंडळी आणि बरीच धमाल-मस्ती मुग्धाला तिच्या गृहप्रवेशाच्यावेळी अनुभवायला मिळाली. शिवाय या व्हिडीओमध्ये एकत्रित कुटुंबाच्या चेहऱ्यावरील हास्यही पाहायला मिळालं. मुग्धा-प्रथमेश घरात प्रवेश करतानाही पारंपरिक पद्धती दोन्ही कुटुंबांनी जपल्या. शिवाय या दोघांचा उखाणा चर्चेचा विषय ठरला.

“कपात ओतला चहा चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय, बाकी सगळ्या मारक्या म्हशी” असा गमतीशीर उखाणा प्रथमेशने मुग्धासाठी घेतला. तर उखाणा घेण्यामध्ये मुग्धाही मागे राहिली नाही. तिनेही यामध्ये बाजी मारली. “मंगळसूत्राच्या दोन वाट्या, म्हणजे माहेरची व सासरची खून, प्रथमेशच नाव घेऊन कलाश्रीमध्ये गृहप्रवेश करते, नीना आणि उमेश लघाटे यांची सून” हा उखाणा मुग्धाने घेतला.
आणखी वाचा – फुलांची सजावट, पाहुण्यांची गर्दी अन्…; मुग्धा वैशंपायनचं सासरी असं झालं स्वागत, व्हिडीओ व्हायरल
दोघांच्या या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. तर काहींना मुग्धा-प्रथमेशने घेतलेला उखाणा अधिक आवडला. यावेळी व्हिडीओवर मुग्धाच्या बहिणीने भावुक कमेंट केली. “मी रडत आहे” असं तिने म्हटलं. याच महिन्यामध्ये मुग्धाची बहीण मृदुलचाही विवाहसोहळा पार पडला. मुग्धाचं लग्न झाल्यानंतर मृदुल अगदी भावुक झाली होती.