Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी आमचं ठरलं म्हणत एकत्र फोटो शेअर करत सोशल मीडियावरून त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून ही जोडी लग्न बंधनात केव्हा अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. त्यांनंतर २१ डिसेंबरला ही जोडी अखेर लग्नबंधनात अडकली. चिपळूण येथे दोघांचं पारंपरिक अंदाजात लग्न उरकलं. त्यांच्या लग्नातील फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याचबरोबर मुग्धा व प्रथमेशचे लग्नापूर्वीचे विधी अत्यंत साधेपणाने उरकल्याने साऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं.
मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. दत्तजयंतीनिमित्त दोघांनी एकत्र भजनसेवा करत त्यांचा लग्नानंतरचा पहिला सण साजरा केला. त्याचे अनेक व्हिडीओ मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर देखील केले होते. यानंतर आता मुग्धाने शेअर केलेल्या गृहप्रवेशावेळच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाने लग्नानंतर लघाटेंच्या घरी गृहप्रवेशावेळचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये फुलांच्या पायघड्यावरुन दोघेही चालताना दिसत आहेत. शिवाय गृहप्रवेशावेळी दोघांनीही स्पेशल उखाणा घेतलेला पाहायला मिळत आहे. प्रथमेशने खास उखाणा घेत, “कपात ओतला चहा चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय, बाकी सगळ्या मारक्या म्हशी” असं म्हटलं आहे. तर मुग्धाने “मंगळसूत्राच्या दोन वाट्या, म्हणजे माहेरची व सासरची खून, प्रथमेशच नाव घेऊन कलाश्रीमध्ये गृहप्रवेश करते, नीना आणि उमेश लघाटे यांची सून” हा उखाणा घेत लघाटेंच्या घरी गृहप्रवेश केला. यानंतर दोघांनी त्यांच्या घरच्या देवाचे दर्शन घेतले.
मुग्धाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या उखाण्यांचे कौतुक केले आहे. मुग्धा-प्रथमेश यांचा अत्यंत साधेपणाने विवाहसोहळा पार पडला असल्याचं दिसतंय. चिपळूण येथे दोघांनी डेस्टिनेशन वेडिंगचा घाट घातला होता. मुग्धा-प्रथमेशचा विवाहसोहळा कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. लग्नादिवशी दोघेही खूप खुश दिसत होते. कलाक्षेत्रातील बऱ्याच कलाकार मंडळींनी मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला हजेरी लावली होती.