मराठीतील तरुण लोकप्रिय गायकांच्या यादीतील मुख्य दोन नावे म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. छोट्या पडदयावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेल्या या जोडीने त्यांच्या गायनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मुग्धा व प्रथमेश ही जोडी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर करत या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश व मुग्धा यांनी त्यांच्या नात्याविषयी सांगितले तेव्हापासूनच त्यांच्या लग्नसोहळ्याकडे चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. (Mugdha Vaishampayan On Instagram)
अशातच २१ डिसेंबर २०२३ रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाला मित्रपरिवार व कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे त्यांचा साधेपणा. दोघांनीही अत्यंत साधेपणाने व घरच्या घरीच त्यांचे लग्नापूर्वीचे विधी उरकले. त्यांचे लग्न पार पडताच सोशल मीडियावर अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले होते. अशातच आता मुग्धा-प्रथमेश यांनी त्यांच्या लग्नाची खास झलक दाखवणारा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा – “‘बिग बॉस’ने माझी दोन घरं उद्ध्वस्त केली”, भर पत्रकार परिषदेत मुन्नवर फारुकीचे आरोप, म्हणाला, “या शोमध्ये…”
प्रथमेश-मुग्धा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमिताने खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला त्यांचा विवाहसोहळा ज्याठिकाणी पार पडला त्या हॉलचे दृश्य पाहायला मिळत आहे. यापुढे सप्तपदी, लग्नातील वऱ्हाड मंडळींची लगबग व मुग्धा-प्रथमेश एकमेकांना हार घालत असल्याचेदेखील पहायला मिळत आहे. तसेच व्हिडीओमध्ये मुग्धा व प्रथमेश यांचा लग्नातील खास लूकही पहायला मिळत आहे.
या संपूर्ण व्हिडीओला ‘डंकी’ या चित्रपटातील सध्या चांगलेच गाजत असलेले ‘ओ माही’ हे रोमॅंटिक गाणे लावण्यात आले आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, “सर्वात शुद्ध व अनंतकाळापर्यंत कधीही न संपणाऱ्या या प्रवासाला एक महिना पूर्ण झाला आहे.” दरम्यान, या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.