Prajakta Koli Vrishank Khanal Married : ‘मिसमॅच्ड’ स्टार प्राजक्ता कोळी अखेर लग्नबंधनात अडकली आहे. बरेच दिवसांपासून प्राजक्ता कोळीच्या लग्नाची सोशल मीडियावर हवा होती. अखेर तिने तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड वृषांक खनालशी लग्न केले. सुमारे १३ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, दोघांनी महाराष्ट्रातील कर्जत येथील ओलिअँडर फार्म्समध्ये लग्न केले. काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या त्यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्याला जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते. २५ फेब्रुवारी रोजी, प्राजक्ताने वृषांकबरोबरचे हृदयस्पर्शी फोटो शेअर केले आणि चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
या फोटोंसह कॅप्शनमध्ये तिने फक्त लग्नाची तारीख लिहिली. “२५.०२.२५”. याबरोबर तिने हार्ट ईमोजीदेखील जोडले. लग्नाचे वृत्तांकन करणाऱ्या ‘व्होग इंडिया’ने या दोघांच्या प्रवासाची खास झलक दाखवली. इंस्टाग्रामवर त्यांनी लिहिले की, “जवळजवळ ११ वर्षांच्या नात्यानंतर, वृषांक खनालने सप्टेंबर २०२३ मध्ये वेस्ट व्हर्जिनियामधील कॅम्पिंग ट्रिप दरम्यान प्राजक्ता कोळीला प्रपोज केले. आणि जेव्हा त्यांनी लग्नाची योजना आखली तेव्हा असे काहीतरी घडले”.
आणखी वाचा – ‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिजचा पहिला भाग उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता शिगेला
व्होगशी झालेल्या संभाषणात दोघांनी या खास दिवसाबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला, “आम्ही आमच्या कुटुंबाला आणि मित्रांना सांगितले की ते पायजमा घालून येऊ शकतात, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त इतकंच हवं होतं की त्यांनी चांगली विश्रांती घ्यावी आणि मजा करावी अशी इच्छा होती. माझ्या थीमनुसार सर्वकाही आरामदायी असावे अशी माझी इच्छा होती. पारिजातकाच्या नमुन्यांसह आणि सजलेल्या सोनेरी लेहेंग्यात प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती तर वृषांकने हस्तिदंती शेरवानी परिधान केली होती.
प्राजक्ता आणि वृषांक बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडप्याने पहिल्यांदा २०२३ मध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली, त्यानंतर लोकांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. कामाबद्दल बोलायचे झाले तर, प्राजक्ता अलीकडेच रोहित सराफबरोबर ‘मिसमॅच्ड सीझन ३’ मध्ये दिसली होती. ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.