Maitricha Saatbara Coming Soon : सोशल मीडियावर एका मराठी वेबसीरिजची सध्या हवा असलेली पाहायला मिळत आहे. आणि ही वेबसीरिज इतर काही नाही मैत्री या शुद्ध, निरागस अशा नात्यावर स्पष्टपणे भाष्य करणारी आहे. हो मैत्रीची अनोखी व्याख्या सांगणारी ‘मैत्रीचा ७/१२’ ही नवीकोरी वेबसीरिज आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘इट्स मज्जा ओरिजिनल’ आणि ‘Media One Solutions Presents ‘ ‘मैत्रीचा ७/१२’ ही नवीकोरी वेबसीरिज आजपासून इट्स मज्जा या युट्युब चॅनेलवरुन प्रेक्षेपित होणार आहे. या वेबसीरिजच्या ट्रेलरने सारी उत्सुकता वाढविली आहे. ट्रेलरमधून सीरिजमधील अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. त्यामुळे अर्थात प्रेक्षकांची सीरिजबाबतची ही उत्सुकता वाढून राहिली आहे.
ट्रेलरपाठोपाठ आता ‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिजचा प्रोमो समोर आला होता. हा प्रोमो पाहूनही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये आई-वडिलांच्या पश्चात आयुष्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारी आणि कॅफे जग असणारी योगिता, तर अनेक ऑडिशन्स देत कायमच फोनवरुन हुशारी करणाऱ्या आदित्यचा हटके अंदाज खास आहे. तर कॅफेसाठी खूप काही करायचं आहे पण तिच्यातील घाबरटपणा, धांदरटपणा छायाच्या डोक्यातून काही जात नाही आहे. बँकेत कस्टमरच्या प्रश्नांनी आणि प्रेशरने कायमच ओढली जाणारी संचिता, तर वशिल्याने वकिली करणारा दौलत आणि कामात कायम समाधान शोधणारा सिद्धार्थ अशी आगळीवेगळी पात्रांची ओळख या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळत आहे.
आदित्य, दौलत, छाया, सिद्धार्थ, संचिता आणि योगिता अशा सहा जिवलगांच्या भोवती फिरणारी ही कथा मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे. हे सहा मित्र त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचा आनंद एकमेकांशी कसा शेअर करतात, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे कसे उभे राहतात हे येत्या २६ तारखेपासून म्हणजेच आजपासून सायंकाळी सात वाजता पाहता येणार आहे.
Media One Solutions Presents & Itsmajja Original ही आगळी वेगळी वेबसीरिज ‘मैत्रीचा ७/१२’ येत्या २६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे. ‘मैत्रीचा ७/१२’ या नव्याकोऱ्या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा अजय पवार यांनी पेलली आहे. तर निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी सांभाळली आहे. तसेच या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे या आहेत. कथा-पटकथा शुभम पाठक यांची असून संवाद ऋषिकेश डी. वाय. पवार यांचे आहेत. तर काही मोजक्या एपिसोडचे संवाद कल्पेश जगताप यांनी लिहिले आहेत. येत्या २६ फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता ‘मैत्रीचा ७/१२’ ही नवीकोरी सीरिज ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.