‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमामुळे पाच पंचरत्न नावारुपाला आले. प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. या शोमधील सुमधूर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गायक म्हणजे प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत, आर्या आंबेकर व कार्तिकी गायकवाड. आता हे पाचही पंचरत्न संगीत क्षेत्रात मोठी कामगिरी करत आहेत. कार्तिकीही विविध कार्यक्रम, गाणी गात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कामाबरोबरच ती खासगी आयुष्यातही अगदी सुखी आयुष्य जगत आहे. २०२०मध्ये तिने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर दीड ते दोन वर्षांपूर्वी गरोदर असल्याचं कार्तिकीने सांगितलं. तिने गोंडस मुलाला जन्म दिला. लेकाबरोबरचा सुंदर व्हिडीओ कार्तिकीने शेअर केला आहे. (Kartiki gaikwad video with son)
काही दिवसांपूर्वीच कार्तिकीचा लेक एक वर्षांचा झाला. पण अगदी कमी वयात घर, मुल सांभाळत कार्तिकी तिच्या गायनाची आवड जोपासत आहे. आता इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिने शेअर केलेला व्हिडीओ याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या मुलानेही गायकच व्हावं अशी बहुदा तिची इच्छा असावी. म्हणूनच की काय गायनाचा सरावही ती लेक रिशांकबरोबरच करते. याचाच व्हिडीओ समोर आला आहे.
आणखी वाचा – हाताला IV, आजारपण अन्…; केदारनाथ यात्रेनंतर अमृता खानविलकर आजारी, व्हिडीओद्वारे सांगितली अवस्था
व्हिडीओमध्ये कार्तिकी एका कार्यक्रमाची रिहर्सल करत आहे. गाणी गात असताना रिशांक तिच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. कार्तिकी मराठी गाणी गात आहे. तर तिला मंचावर वादकांची साथ मिळत आहे. दरम्यान रिशांक आई गात असलेल्या गाण्यांचा आनंद घेताना दिसत आहे. कार्तिकीच्या मांडीवर अगदी शांतपणे बसून तो त्याच्याभोवती असणाऱ्या वातावरणामध्ये रमला आहे.
लहानपणापासूनच रिशांकवर गायनाचे संस्कार होत आहे. व्हिडीओ शेअर करत कार्तिकीने म्हटलं की, “कार्यक्रमाच्या रिहर्सल दरम्यानची रिशांकबरोबरची एक गोड आठवण”. रिशांक कानटोपी, सुंदर कपड्यांमध्ये अगदी गोड दिसत आहे. मध्यंतरी कार्तिकीने पहिल्यांदाच लेकाच चेहरा दाखवला. गाणं गात तिने लेकाला सगळ्यांसमोर आणलं होतं. खास अंगाई गीत गायलं. या व्हिडीओमध्ये पती रोनित पिसे व मुलासह ती दिसली होती.





