प्रत्येक कलाकाराचं स्वतःचं घर असणं हे खूप मोठं स्वप्न असतं. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी अभिनेत्रींनी मुंबईत स्वत:चं घर घेतलं. या अभिनेत्रींच्या यादीत आता केतकी माटेगांवकरही मागे राहिलेली नाही. केतकी ही उत्तम गायिका असून तिने अभिनयक्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाइमपास’, ‘शाळा’ या चित्रपटात केतकीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासह तिने गायनाची कलाही जोपासली आहे. (Ketaki Mategaonkar On Her Home)
मूळची पुण्याची असलेल्या केतकीने मुंबईत स्वतःचं स्वप्नातलं घर घेतलं आहे. मुंबईत घर घेण्याचं केतकीचा स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. मुळात केतकी ही एकुलती एक आहे. बरेचदा तिचे पालक केतकीसह चित्रीकरणाला तिच्याबरोबर असतात. सोशल मीडियावरूनही केतकी तिचं तिच्या आई बाबांबरोबरच बॉण्डिंग शेअर करत असते. एकुलती एक मुलगी आता स्वतःच्या घरी जाणार, आपल्यापासून दूर राहणार याची चिंता अर्थात केतकीच्या आई वडिलांना सतावत होती.
‘इट्स मज्जा’च्या ‘माझ्या घराची गोष्ट’ या सेगमेंटमध्ये केतकीच्या घराची झलक पाहायला मिळाली. यावेळी केतकीने बऱ्याच घराबाबतच्या गोड आठवणी शेअर केल्या. यावेळी बोलताना केतकीने आई-बाबांपासून दूर राहण्याच्या निर्णयाला त्यांनी कसा पाठिंबा दिला याबाबत भाष्य केलं. केतकी म्हणाली, “सुरुवातीला माझ्या घरी मी एकटी राहणार असं ठरलं. नंतर आई-बाबा दोघेही बोलू लागले की, आता तू एकटी राहणार का? आम्हाला तू सोडून जाणार का? असं बोलल्यावर चिंता वाढली. मात्र आता उलट झालं आहे की, माझ्या आई-बाबांचं मुंबईत काम अधिक वाढलं आहे, त्यामुळे त्यांचा मुंबई-पुणे प्रवास वाढला आहे. माझ्या घराचा पायगुण आहे म्हणून माझ्या आईचं, बाबांचं व माझंही काम वाढलं असल्याचं चित्र दिसत आहे”.
यापुढे केतकी म्हणाली, “आई-बाबा इथे राहत नाहीत, पण ते माझे शेजारी आहेत. आम्हाला २ बीएचके फ्लॅट घ्यायचा होता. पण मला स्वतःचं घर घ्यायचं होत म्हणून मी माझ्या बाबांना सांगितलं की, आपण वेगवेगळे दोन फ्लॅट घेऊ. आणि म्हणूनच मी व माझ्या बाबाने एकाच बिल्डिंगमध्ये दोन वेगवेगळे फ्लॅट घेतले आहेत. मी १९व्या मजल्यावर राहते आणि माझ्या आई-बाबांनी १८व्या मजल्यावर घर घेतलं आहे. यावरून गमतीत कधी कधी माझे बाबा म्हणतात की, केतकी तू खरंच आमच्या डोक्यावर बसली आहे”. आणखी वाचा – मराठी चित्रपटांचं लंडनमध्ये होणाऱ्या शुटिंगबाबत ‘झिम्मा २’ दिग्दर्शक हेमंत ढोमे स्पष्टच बोलला, म्हणाला, “आपली सिस्टीम…”