सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती ‘झिम्मा २’ चित्रपटाची. ‘झिम्मा २’ चित्रपटाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अवघ्या एका दिवसात या चित्रपटाने १.२० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट पाहण्यासाठी समस्त महिला वर्ग चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. ‘झिम्मा २’ चित्रपटात दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे झाले आहे. आजकाल महाराष्ट्रातील बरेच चित्रपट हे परदेशात चित्रित होत आहेत. (Hemant Dhome On Shooting)
‘झिम्मा २’ हा महाराष्ट्राबाहेर म्हणजेच लंडन येथे चित्रित करणं का सोप्प आहे, याचा खुलासा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने केला आहे. हेमंतने अजब-गजब या यूट्यूूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना हेमंत म्हणाला, “शूटिंगसाठी एशियाटिक लायब्ररी घ्यायची झाली तर अडीच ते तीन लाख रुपये भरावे लागतात. तीसुद्धा रविवारीच घ्यायची. त्याअगोदर खूप साऱ्या परवानग्या घ्याव्या लागतात”.
यापुढे सिस्टीमबद्दल बोलताना हेमंत म्हणाला, “सी लिंकवर शूटिंग करण्याची परवानगी कायदेशीररित्या घ्यायला गेलं तर साडेतीन लाख रुपये भरावे लागतात, तेही जेमतेम तासांसाठी. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे आपली सिस्टीम एवढी वाईट आहे की, या सिस्टीममध्ये शूटिंग करताना पोलिसांना पैसे द्यावेच लागतात. तुम्हाला ग्रामपंचायतीला पैसे द्यायचेत, तुम्हाला पोलीस यंत्रणेला पैसे द्यायचेत. शूटिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचं घर आलं तर त्यालाही पैसे द्यावे लागतात”, असंही हेमंत म्हणाला.
हेमंत पुढे म्हणाला, “लंडनची सुटसुटीत वन विंडो सिस्टीम आहे. परवानगी घेतानाच तुम्हाला तिथं द्यावं लागतं, तुम्ही कुठे शूटिंग करणार आहात आणि किती लाईट वापरणार आहात. त्यानंतर तुम्ही रस्त्यावर कुठेही शूट करा, गोंधळ घाला, कोणाचंही घर येऊदे, कोणीही तुम्हाला विचारायला येत नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने मराठी निर्मात्यांना ते सोप्प वाटतं आणि दुसरं म्हणजे मी सारखं लंडनला शूटिंगला जातो, कारण त्याचे पैसे वसूल होतात” असं म्हणत महाराष्ट्रापेक्षा लंडनला शूट करणं सोयीस्कर कसं आहे, याबाबत हेमंतने स्पष्टीकरण दिलं.