बॉलिवूडच्या ८०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आवर्जून ज्यांचं नाव घेतलं जायचं त्या अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी व हेमा मालिनी. या दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याकाळात या अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा सगळ्यांनाच होती. त्यावेळी तर श्रीदेवी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार म्हणून पाहिलं जायचं. एक काळ असा होता जेव्हा श्रीदेवी व हेमा मालिनी यांच्यात शीतयुद्ध सुरु असायचं. पण तितकाच ते दोघं एकमेकांचा आदरही करायचे. पण एकदा असं घडलं की श्रीदेवी यांनी हेमा मालिनी यांच्यावर शाब्दिक ताशेरे ओढले. ‘ड्रीम गर्ल’ एका विवाहीत पुरुषाला डेट करत असल्याच्या विषयावरून त्यांची खिल्लीही उडवली होती. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी हेमा यांना त्यांच्या वक्तव्यातून टोमणाही मारला होता. (sridevi angry on hema malini)
खरतर, श्रीदेवी यांचं नाव अभिनेता जितेंद्र यांच्याबरोबर जोडलं जात होतं. दोघांनी एकमेकांबरोबर बरेच चित्रपट केले होते. जे त्या काळात बरेच हीट ठरले होते. त्यांच्या जोडीला तर प्रेक्षकांकडून बरीच पसंती मिळत होती. एकीकडे श्रीदेवी यांचं नाव जितेंद्र यांच्याबरोबर जोडलं जात होतं जे त्यावेळी आधीच विवाहित होते. तर दुसरीकडे, मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर लिंकअप असल्याच्या चर्चांना उथाळ आलं होतं. त्यानंतर श्रीदेवी यांनी या सगळ्या अफवांना एक मुलाखतीत प्रतिक्रिया देत पूर्णविराम लावला. १९८४मध्ये ‘स्टारडस्ट’ मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं, “कधीच नाही. खरं सांगू, आजपर्यंत मी कधीही जितेंद्रच्या हॉटेल खोलीत गेले नाही की तो कधी माझ्या घरी आला नाही. मला माहीत आहे लोक माझ्याबद्दल खूप वाईट बोलत आहेत. मी एवढी मुर्खही नाही आणि मी नरभक्षीही नाही”.
पुढे बोलताना श्रीदेवी यांनी सांगितलं, “हे माझ्यासाठी काही नवीन नाही. मला या सगळ्याची सवय आहे आणि या सगळ्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. माझे आई-वडील रुढीवादी आहेत पण त्यांना माहित आहे की ही इंडस्ट्री कशी आहे. याशिवाय ते बऱ्याच वेळा जितेंद्रना भेटले आहेत. ते एकमेकांना खूप चांगले ओळखतात”.
या मुलाखतीदरम्यान श्रीदेवी यांना विचारण्यात आलं की त्यांची मैत्रिण हेमा मालिनी एक विवाहीत पुरुषाला डेट करत आहे, तेव्हा त्या म्हणाल्या, “मी कधीच विवाहीत पुरुषाशी लग्न करणार नाही. दाक्षिणात्यांमध्ये दुसरी बायको असणं हा एक अतिशय चुकीचा समज आहे. इथेही विवाहित पुरुषांशी लग्न करणं किंवा दुसरी पत्नी होणं ही मोठी गोष्टी मानली जाते. सगळे चर्चा करतात. मुंबईपेक्षा दक्षिणेतील लोक अधिक परंपरावादी विचारांचे आहेत”, असं सांगत हेमा मालिनीच्या वागण्यावर आपलं मत स्पष्ट करत हेमाजींच्या वागण्यावर टोमणा मारला.