अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री कतरिना कैफ ही जोडी बॉलिवूडमधील आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. विकी व कतरिना यांनी ९ डिसेंबर २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. याअगोदर दोघांनी काही काळापर्यंत एकमेकांना डेट केलं होतं आणि त्यानंतर गुपचुप लग्न उरकुन घेतलं. यांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. सध्या विकी त्याच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. चित्रपटातील त्याची भूमिका सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तर दुसरीकडे कतरिना तिच्या ‘टाइगर ३’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचं बरंच कौतुक होत आहे. विकीदेखील तिच्या या चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान विकीने खुलासा केला की कतरिनाने त्याला धमकी दिली होती. (katrina kaif angrily threaten to Vicky kaushal)
विकी जेव्हा त्याच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता त्यावेळची त्याने कतरिनाबरोबरचा एक किस्सा शेअर केला. जो किस्सा ऐकताच चाहतेदेखील अवाक झाले आहेत. ‘पिंकविला’ला दिलेल्या एक मुलाखतीत विकीने खुलासा केला, “हा तो काळ होता जेव्हा मी सारा अली खानबरोबर ‘जरा हटके, जरा बचके’, या चित्रपटाच्या शुटिंग करत होतो. मी लग्नाआधी चित्रपटाचं अर्ध शूटिंग पूर्ण केले होते. त्यानंतर मी लग्नासाठी माझ्या घरी गेलो. लग्नानंतर मला सेटवरून फोन करुन बोलवण्यात आलं. त्या कॉलनंतर मला कतरिनाकडून धमकी मिळाली की, ‘दोन दिवसांमध्येच सेटवर जायचं असेल तर लग्नच करु नकोस’. त्यानंतर मी त्यांना काही सांगितलं नाही. मी पाच दिवसांनंतर सेटवर गेलो”.
विकीला विचारण्यात आलं की तो कतरिनाबरोबर कामाच्या, स्क्रिप्ट विषयांवर चर्चा करतो का? त्यावेळी विकी म्हणाला, “नाही आम्ही कामाबद्दल चर्चा करत नाही”. विकी-कतरिना लवकरच त्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहेत.
लवकरच विकीचा ‘सॅम बहादूर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासह फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट रणबीर कपूरच्या चित्रपटाबरोबर १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.