टेलिव्हीजनवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. त्यातील एक कलाकार म्हणजे ओंकार राऊत. ओंकारने आजवर त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ओंकार राऊतला महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे अफाट लोकप्रियता मिळाली. अभिनयाची उत्तम जाण व विनोदाचं अचूक टायमिंग साधत ओंकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. अभिनयाबरोबरच ओंकार सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय असतो. अनेकदा त्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत येताना दिसतात. मात्र सध्या तो कोणत्याही पोस्टमुळे नाही तर एका नेटकऱ्याला दिलेल्या उत्तरामुळे अधिक चर्चेत आला आहे. ओंकारने कोणाला उत्तर दिलं आहे? तसेच तो काय म्हणाला हे आपण आता जाणून घेऊया. (onkar raut viral post)
काल म्हणजे २५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात नाताळ साजरी करण्यात आली. यावेळी अनेक कलाकारांनी नाताळच्या हटके पद्धतीने शुभेच्छादेखील दिल्या. नाताळच्या सजावटीचे अनेक फोटोही शेअर केले. ओंकारनेदेखील फोटो शेअर करत सगळ्यांना नाताळच्या खास शुभेच्छा दिल्या. त्यावर अनेकांनी पसंतीदेखील दर्शवली आणि प्रतिक्रियादेखील दिल्या. मात्र एका प्रतिक्रियेने लक्ष वेधून घेतले. ओंकारने शेअर केलेल्या फोटोवर एकाने लिहिले होते की, “कधी आपल्या सणांच्या पोस्ट टाकल्या आहेत का भावा?”, त्यावर ओंकार उत्तर देत लिहिले की, “हो रे, मी जे सण साजरे करतो त्याचे फोटो कधी शेअर करतो तर कधी करत नाही. मुळात सण हा आनंद पसरवतो. त्यामध्ये हा सण आपला, तो सण त्यांचा अशी घाणेरडी वृत्ती नको”.
पुढे त्याने लिहिले की, “मी लहानपणापासून गणपतीत मोदक खाल्ले आहेत, दिवाळीत फराळ, होळीला पूरणपोळी, ख्रिसमसला सांता क्लॉजकडून येणाऱ्या गिफ्टचीही वाट बघितली आहे. ईदला माहीमला जाऊन मालपोहे खाल्ले आहेत. प्रसन्नतेने गुढीपाडवा साजरा केला आहे तसेच मोठ्या उत्साहाने ३१ डिसेंबरही साजरी करतो. म्हणून हे असले प्रश्न परत कोणालाही विचारु नकोस. मेरी ख्रिसमस. सांता तुला गिफ्ट म्हणून सुविचार देवो”.
दरम्यान ओंकारच्या या प्रतिक्रियेला लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. ओंकारच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करताना दिसून येत आहे. त्याच्या विनोदी शैलीमुळे त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुकदेखील केले जाते. याआधीदेखील तो मराठीमध्ये काम करताना दिसून आला आहे.