छोट्या पडद्यावरील काही मालिका अशा आहेत, ज्या नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. सध्या अनेक वाहिनी काही लोकप्रिय मालिका दाखवल्या जात असून त्या मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात. अशीच एक मालिका जी काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ती मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’. २०१९ मध्ये आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. प्रसिद्ध व्यवसायिक असलेला विक्रांत आणि मध्यमवर्गीय ईशाची लव्हस्टोरी यात दाखवण्यात आली होती. त्यानंतर दोघांचे लग्न, पहिली पत्नी राजनंदिनीची होणारी एन्ट्री आणि विक्रांतची दुसरी बाजू प्रेक्षकांना यात पाहायला मिळाली होती. (Tula pahate re popular in South Africa)
अभिनेता सुबोध भावेने मालिकेत विक्रांत सरंजामेची, तर अभिनेत्री गायत्री दातारने ईशा निमकरची भूमिका साकारली होती. दोघांची ही भूमिका तर आवडलीच, शिवाय अन्य कलाकारांची व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देश-विदेशातील प्रेक्षकांना ही मालिका प्रचंड आवडल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेतही मालिका पाहिली जात असून तेथील एका चाहत्याने मालिकेबद्दल एक प्रतिक्रिया दिली, जे पाहून सुबोध प्रचंड भारावला.
हे देखील वाचा – लक्ष्मीपूजनाला सुभेदारांच्या घरात होणार प्रतिमाची एंट्री; मालिकेत येणार नवा ट्विस्ट, तर सायलीच्या आयुष्यात घडणार…
सुबोधने नुकतंच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली. ज्यामध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेतील चाहत्याच्या कमेंटला आपली प्रतिक्रिया दिली. तो चाहता यात म्हणाला, “खूप अभिनंदन सर, संपूर्ण दक्षिण आफ्रिकेतील चाहत्यांच्या वतीने मी तुमचं कौतुक करत आहे. आम्ही सर्वजण तुमची ‘तुला पाहते रे’ मालिका आमच्या इसिझुलू भाषेत भाषांतरित करून पाहतो. या मालिकेतून आम्हाला खूप मनोरंजक कथा पाहायला मिळते. आम्हा सर्वांना तुमचा आणि तुमच्या टीमचा अभिमान खूप अभिमान वाटतो. तुम्हाला हे माहित असेल, की आम्ही या मालिकेचा एकही भाग न चुकवता पाहतो. जेव्हा बिपीन आणि ईशाला एकत्र बाईकवर बसलेले पाहतात, ज्यावर तुम्ही चिडतात. तो भाग मला प्रचंड आवडला. मिस्टर भावे, तुम्ही यात खूप छान काम केलं आहे. आम्हाला तुम्ही आवडता. आणि असेच दीर्घायुषी व्हा.”, अशी प्रतिक्रिया त्या चाहत्याने दिली आहे.
हे देखील वाचा – “एक किलो वजनही वाढलं अन्…”, दिवाळीला घरी गेलेल्या प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “भाच्यांना…”

तर सुबोधने चाहत्यांच्या या कमेंटवर प्रतिक्रिया दिली. तो यामध्ये म्हणाला, “‘तुला पाहते रे’ मालिका आता दक्षिण आफ्रिकेतसुद्धा प्रसिद्ध झाली. तेथील चाहत्यांकडून मला दररोज असंख्य प्रतिक्रिया येतात.”. हे सांगताना त्याने झी मराठी, निर्माते अतुल केतकर, अपर्णा केतकर आणि अभिनेत्री गायत्री दातार यांना टॅग केलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.