मराठी मनोरंजन विश्वात मालिकांचे एक महत्व वेगळेच आहे. मालिकेचे शूटिंग हे जवळपास दररोज असल्याने मालिकेतील कलाकारांचे मालिकेच्या सेटशी एक वेगळेच नाते निर्माण होते आणि त्यामुळे मालिकेचा सेट हा मालिकेतील कलाकारांचे दुसरे घर होते. कलाकारांसह प्रत्येक प्रेक्षकाला मालिका या आपल्या कुटुंबाचाच एक भाग वाटत असतात आणि जेव्हा या मालिका बंद होतात तेव्हा साहजिकच कलाकारांना वाईट वाटते. (Aditya Vaidya On Instagram)
अशातच झी मराठी वाहिनीवरील ‘तु चाल पुढं’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकरने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. त्यावरूनच ही मालिका संपणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. ‘तू चालं पुढं’ या मालिकेत धनश्री शिल्पी हे पात्र साकारत आहे. सेटवरचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने त्याला “शूटिंगचे शेवटचे काही दिवस” असं कॅप्शन दिलं होतं. अशातच आणखी एका अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर करत याला दुजोरा दिला आहे.
अभिनेता आदित्य वैद्यने त्याच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते भावुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याने श्रेयस वाघमारे हे पात्र साकारले असून या पात्राला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तसेच या मालिकेलादेखील चांगली लोकप्रियता मिळाली होती. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या मालिकेला व कलाकारांनादेखील चांगलेच नावाजले गेले.
आदित्य वैद्य व गणेश सरकटे हे दोघे या व्हिडीओत एकमेकांना मिठी मारत भावुक होत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच ते त्यांच्या सेटकडे भावुक होऊन प्रत्येक गोष्ट निरखून पाहत आहेत. दरम्यान, या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनीही मालिका बंद होत असल्यामुळे नाराजी व दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच ही मालिका व या मालिकेतील कलाकार कायमच आठवणीत राहतील अशा भावना व्यक्त केल्या आहेत.