‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका सध्या खूप प्रकाशझोतात आहे. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. पारू-आदित्य या जोडीला विशेषतः खूप प्रेम मिळत आहे. मात्र ‘पारू’ मालिकेतील अशी एक भूमिका आहे जिने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही भूमिका म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर. मालिकेतील मुख्य अभिनेत्याची आई म्हणजे अहिल्यादेवी. ही भूमिका मुग्धा कर्णिक या गुणी अभिनेत्रीने साकारली आहे. करारी नजर, चेहऱ्यावरुन कठोर पण तितकीच प्रेमळ आई. अशा विविध छटा मुग्धाच्या अभिनयातून सहजतेने दिसून येतात. (mugdha karnik instagram post)
अहिल्यादेवी म्हणून प्रसिद्ध असलेली मुग्धा सोशल मीडियावरदेखील कमालीची सक्रिय असलेली बघायला मिळते. २०२४ हे वर्ष संपायला काही दिवसच बाकी आहेत. या निमित्ताने मुग्धाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. मुग्धाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “ २०२४ हे खूप आठवणीत राहणारे वर्ष ठरले आहे. या वर्षाने मला खूप काही दाखवले आणि नंतर मी पुन्हा सगळ्यातून सावरलेदेखील. मी माझ्या आयुष्यातील अनेक चढउतार यावर्षी पाहिले पण माझ्या आयुष्यातील हा सर्वात परिपूर्ण अनुभव होता. काही लोक गमावले आणि नवीन कमावले”.
पुढे तिने लिहिले की, “सामर्थ्य आणि लवचिकता हे २०२४ मध्ये मला अनुभवायला मिळाले. २०२५ मध्ये प्रवेश करेन ते माझ्यासाठी आनंदाचे आहे. पण मला माझ्या जुन्या प्रवृत्तींशी लढण्यासाठी शक्तीची गरज आहे. ज्या प्रकारे मी लोकांना पाहते, लोकांवर प्रेम करते पण मला तितके महत्त्व मिळत नाही. त्यामुळे २०२५ मध्ये मी स्वतःवर अधिक प्रेम करेन. जगण्यासाठी आणि वाढण्यास आणि स्वतःसाठी मी सक्षम होऊन आले आहे”. दरम्यान मुग्धाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत राहिली आहे.
मुग्धाने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. तसेच आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. ‘पारू’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. सध्या ही मालिका तिच्या कथानकामुळे गाजत आहे. या मालिकेतील पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेत सध्या पारूचा खडतर प्रवास आणि या प्रवासात आलेल्या संकटाना तोंड देत तिची लढाई पाहणं रंजक ठरत आहे. या मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत आहे.