मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनयाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. २००४ साली त्याने दिग्दर्शक केदार शिंदेच्या ‘अगबाई अरेच्चा’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘जत्रा’, ‘साडेमाडे तीन’, ‘चांगभलं’, ‘माझा नवरा तुझी बायको’ या मराठी चित्रपटांमध्ये तर ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न’, ‘फूल थ्री धमाल’ अशा हिंदी चित्रपटामध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. त्याने आपल्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दलचा अनुभाव शेअर केला आहे. त्याने सेक्रेड गेम्सच्या वेळी आलेल्या वाईट अनुभवाबद्दल भाष्य केले आहे. (siddharth jadhav on sacred games)
सिद्धार्थने नुकतीच युट्यूबर सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यावेळी त्याने चित्रपटसृष्टीत आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे. त्याने सांगितले की, “सेक्रेड गेम्समधील एका भूमिकेसाठी मला बोलावण्यात आले होते. मी ऑडिशन दिली आणि नंतर माझी निवडदेखील झाली होती. पण नंतर मानधनाबद्दल बोलणी सुरु असताना अपेक्षेपेक्षा कमी मानधन मिळत होते. याबद्दल विचारले असता ती व्यक्ती म्हणाली की इतर मराठी कलाकारदेखील एवढ्याच कमी रक्कमेत काम करतात मग तुला काय अडचण आहे? पण हे सर्व मला पटलं नव्हतं. पैसा म्हणजे सगळं काही नाही. तुम्ही आम्हाला आदरदेखील दिला पाहिजे. तुमच्या कामामुळेच तुम्हाला पुढचं काम मिळतं”.
तसेच “ ‘सेक्रेड गेम्स’ ही सिरिज का सोडली?” असा प्रश्नदेखील त्याला विचारला. त्यावर त्याने सांगितले की, “माझी ज्या भूमिकेसाठी निवड झाली होती ती व्यक्तिरेखाच सिरिजमधून काढून टाकली होती. वेबसिरिजची वेळ वाढली होती. पण ही व्यक्तिरेखा काढली हे बरचं झालं”, असेही तो म्हणाला.
सध्या सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो ‘द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज्’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर जॉनी लिव्हर,जयेश ठक्कर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, भरत दाभोळकर,विजय पाटकर, रेश्मा टिपणीस हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट ५ एप्रिल २०२४ साली प्रदर्शित होणार आहे. या चित्रटपटाचे दिग्दर्शन राजीव कुमार साहा यांनी केलं आहे.