2023 Marathi Celebrity Wedding : २०२३ हे वर्ष अनेक विविध कारणांसाठी चर्चेत राहिलं. सिनेसृष्टीसाठी तर हे वर्ष अधिकच खास होतं. अनेक कलाकार मंडळींनी चाहत्यांसह गुडन्यूज शेअर करत त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तर काही कलाकारांनी लग्नगाठ बांधत चाहत्यांसह गुडन्यूज शेअर केली. यंदाच्या वर्षी एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळाले. सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असताना नेमके कोणते कलाकार लग्नबंधनात अडकले ते पाहुयात :
वनिता खरात-सुमित लोंढे
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारी २०२३ रोजी विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह तिने लग्नगाठ बांधली. वनिताचं अगदी थाटामाटात लग्न पार पडलं. वनिता-सुमितच्या लग्नाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिता व सुमित यांच्या प्रीवेडिंग फोटो शूटबरोबरच लग्नापूर्वींच्या विधींचे फोटोही व्हायरल झाले होते. वनिताच्या मेहंदी तसेच हळदीच्या फोटोंनीही लक्ष वेधून घेतले होते.
दत्तू मोरे-स्वाती घुंगाने
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेला कलाकार दत्तू मोरेने २३ मे रोजी अगदी गुपचूप लग्न उरकलं. प्रिवेडिंगचे काही खास फोटो दत्तूने सोशल मीडियावर शेअर करताच सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला. दत्तूने त्याच्या लग्नाची गोष्ट अतिशय खासगीत राखून ठेवली होती. त्यामुळे त्याच्या लग्नाच्या बातमीने सर्वांना आनंद झाला. दत्तूच्या लग्नातील रिसेप्शन लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दत्तूने स्वाती घुंगाने हिच्याशी लग्नगाठ बांधली असून स्वत:ला वन अँड ओन्ली म्हणणाऱ्या दत्तूला आता आयुष्यभराचा जोडीदार मिळाला आहे. स्वाती ही पेशाने डॉक्टर आहे.
अमृता देशमुख-प्रसाद जवादे
अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे यांचा शाही विवाहसोहळा शनिवार (१८ नोव्हेंबर) रोजी संपन्न झाला. प्रसाद-अमृताच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रसाद -अमृताच्या शाही विवाहसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. दरम्यान त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती.
स्वानंदी टीकेकर-आशिष कुलकर्णी
अभिनेत्री स्वानंदी टीकेकर व गायक आशिष कुलकर्णी २५ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. अगदी थाटामाटात स्वानंदी-आशिष यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यांच्या या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारमंडळी, त्यांचे कुटुंबीय, तसेच जवळचे काही नातेवाईक व मित्रमंडळीही उपस्थित होते. स्वानंदी-आशिषच्या रिसेप्शन सोहळ्यातील भरजरी कपडे व महागड्या दागिन्यांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर
अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने कन्टेन्ट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरसह २५ डिसेंबर २०२३ रोजी लगीनगाठ बांधली. गौतमीने तिच्या नात्याचा खुलासा थेट तिच्या मेहंदी सोहळ्यानिमित्त केला. गौतमी-स्वानंदच्या लग्नातील लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गौतमीच्या लग्नातील खास बाब म्हणजे त्यांचं लग्न पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये झालं. या रिसॉर्टमधील लक्षवेधी जागांनी या शाही विवाहसोहळ्याची शान वाढविली.
मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे
गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनीही आमचं ठरलंय! असं म्हणत प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. त्यानंतर अखेर मुग्धा-प्रथमेशने आमचं झालंय पर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नातील व लग्नापुर्वीच्या विधीतील साधेपणाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. उपस्थित मित्र परिवार व कुटुंबियांच्या उपस्थित मुग्धा-प्रथमेश यांचा विवाहसोहळा चिपळून येथे पार पडला.
सुरुची अडारकर-पियुष रानडे
अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांनी ६ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. सुरुचीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिने हे लग्नाचे सुंदर फोटो शेअर केल्यानंतर आता चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करुन त्यांना शुभेच्छा देत आहेत. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित दोघांनी लग्नगाठ बांधली.