२०२३ या वर्षात मराठी मनोरंजन विश्वात अनेक घडामोडी घडल्या. २०२३ वर्षात कुणी विवाहबंधनात अडकले तर कुणी नवीन बाळाला जन्म दिला. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या घरी या वर्षी नवीन पाहुण्याचे आगमन झाले. या वर्षात अभिनेत्री राधा सागर व सई लोकुर या अभिनेत्री आई झाल्या तर अभिनेता विजय आंदळकर, जयेश शेवलकर व राहुल वैद्य हे कलाकार बाबा झाले.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ व ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेली अभिनेत्री म्हणजे राधा सागर. राधाने १० सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आई झाल्याची बातमी शेअर केली होती. यावेळी तिने खास पोस्ट शेअर करत असे म्हटले होते की, “आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण. आम्हाला मुलगा झाला आहे. तो आल्यावर त्याने त्याची जादू दाखवायला सुरुवात केली आहे. जीवनाच्या या नवीन मालिकेत आम्हाला आई-वडील म्हणून कास्ट केल्याबद्दल धन्यवाद”
‘बिग बॉस मराठी’मधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सई लोकुर. सईने नुकतीच तिच्या आयुष्यातली एक गोड बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री सई लोकुर ही १७ डिसेंबर रोजी आई झाली. सईने आई झाल्याची गोड बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत एक खास पोस्टदेखील लिहिली होती. यात तिने असे म्हटले होते की, “आमच्या आयुष्यात एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं आहे. ती खूप सुंदर व निरोगी आहे. आता ती सगळ्यांचीच लाडकी असणार आहे. या काळात तुमचा पाठिंबा व तुमच्या प्रार्थनांसाठी आम्ही आभारी आहोत. आमच्या बाळाच्या आगमनाची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत. तसेच सगळ्यांच्या प्रेमासाठी व शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.”
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील विविध मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतून अल्पवधीतच लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे विजय आंदळकर. ११ एप्रिल रोजी विंजयच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. विजयने सोशल मीडियावर “बाबा झालो. लक्ष्मी घरी आली रे” असं म्हणत चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली होती.
सोनी मराठी वाहिनीवर ‘गाथा नवनाथांची’ या अध्यात्मिक मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे जयेश शेवलकर. जयेशने या मालिकेत मच्छिंद्रनाथांची भूमिका साकारली आहे. जयेशला ६ जानेवारी रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. “माझ्या मुलाचे स्वागत आहे. मी तुला वचन देतो की मी तुला चांगला माणूस बनवेन आणि तु शांत व समृद्धीने आयुष्य जगशील” असं म्हणत त्याने त्याच्या घरी आलेल्या नवीन पाहुण्याची बातमी शेअर केली होती.
‘बिग बॉस’मधून घराघरांत लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे राहुल वैद्य व दिशा परमार. बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर राहुल व दिशा परमार यांचा विवाहसोहळा पार पडला. २० सप्टेंबरला दिशा व राहुल यांच्या घरी छोट्या परिचं आगमन झालं. गणपतीच्या दरम्यान दोघांच्या घरी लक्ष्मी आली. मराठमोळ्या पद्धतीनं राहुल-दिशाच्या मुलीचं बारसं पार पडलं. “लक्ष्मी आली आहे. आम्ही एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बाळ व बाळाची आई दोघांची प्रकृती उत्तम असून मी यासाठी आमच्या डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. आम्ही खूप खुश असून बाळावर तुमचे आशीर्वाद असू द्या.” असं म्हणत राहुल व दिशा यांनी लाडक्या लेकीची बातमी चाहत्यांना दिली होती.
दरम्यान, हे कलाकार यंदाच्या वर्षात आई-बाबा झाले आहेत. त्यांना झालेल्या आपत्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्यावर चाहत्यांनी लाईक् व कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला. तसेच त्यांना कमेंट्सद्वारे शुभेच्छाही दिल्या आहेत.