सध्या बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटांबरोबरचं मराठी चित्रपटही धुमाकूळ घालत आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटाने तब्बल पाचव्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. चित्रपटाच्या कथानकामुळे व कलाकारांमुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. महिला वर्ग या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा’ व ‘झिम्मा २’ या चित्रपटांमुळे दिग्दर्शक हेमंत ढोमे विशेष चर्चेत आला. (Hemant Dhome On Kshiti Jog)
सांगा तुमची #झिम्मागर्ल या प्रश्नाचं सगळेच प्रेक्षक उत्सुकतेने उत्तर देताना दिसत आहेत. यांत कलाकार मंडळीही काही मागे राहिलेले नाहीत. झिम्मा २ चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने देखील या प्रश्नाचं उत्तर देत सोशल मीडियावरून खास पोस्ट शेअर केली आहे. हेमंतने त्याची पत्नी निर्माती, अभिनेत्री क्षिती जोगचा फोटो शेअर करत, “सांगा तुमची #झिम्मागर्ल. मी आज जे काही काम करत आहे, जे काही बरं करू शकत आहे, त्या सगळ्या मागची सारी ऊर्जा या फोटोत आहे. जिथुन सुरुवात होते आणि जिथे सारं संपतं. तुच माझी ॲक्शन आणि माझी कट. लव्ह यु पाटलीणबाई, प्रत्येक वेळी मला पाठिंबा दिल्याबद्दल. माझी झिम्मा गर्ल” असं कॅप्शन देत त्याच्या आयुष्यातील झिम्मागर्लचा खुलासा केला आहे.
प्रत्येक पुरुषाच्या पाठीशी वा बरोबरीने एक स्त्री असते त्याप्रमाणे हेमंतच्या आयुष्यातही त्याची पत्नी त्याची खंबीर साथ आहे. आजवर हेमंत व क्षिती यांनी एकत्र एकमेकांना साथ दिलेली सर्वांनाच माहित आहे. सिनेइंडस्ट्रीतील हे एक लोकप्रिय जोडपं आहे. क्षिती अभिनयात सक्रिय आहे तर हेमंत सध्या दिग्दर्शन क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. या क्षेत्रात त्याला भरपूर यश मिळत आहे. पण या सर्व गोष्टीत त्याला क्षितीने मोलाची साथ दिली.
क्षिती व हेमंत यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचे झाल्यास ‘सावधान शुभमंगल’ या नाटकादरम्यान त्यांची ओळख झाली होती. पुढे एकमेकांच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांच्यातील प्रेम बहरत गेलं. एकमेकांना प्रपोज न करता हेमंत व क्षिती प्रेमात पडले. छोटेखानी साखरपुडा करुन १० डिसेंबर २०१२ रोजी दोघांनी पुण्यात त्यांचा विवाहसोहळा उरकला.