मराठी चित्रपट सृष्टीतील सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना दीदी यांनी काल जगाचा निरोप घेतला. मागच्या महिन्याभरापासून सुलोचना दीदी यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितल जात होत. दरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांनी दादर येथील शुश्रुषा हॉस्पिटल येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वयाच्या ९४ व्या वर्षी सुलोचना दीदी यांची प्राणज्योत मालवली. आज दादर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.(Sulochana Latkar Passes Away)
सुलोचना दीदी यांच्या फिल्मी करिअरबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी मराठी सिनेविश्वासोबतच हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी काम करताना त्या चरित्र अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. आपल्या सोज्वळ लूकने आणि उत्तम अभिनय कौशल्याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे सुलोचना दीदी यांचे गाजलेले सिनेमे आहेत. २५० हुन अधिक मराठी सिनेमांत त्यांनी काम केलं आहे.
सुलोचना दीदी यांच्या जाण्याने सिनेमाविश्वातल्या कलाकार मंडळींनी हळहळ व्यक्त केली आहे. सुलोचना दीदी यांच्यासोबत काम केलेल्या सहकलाकारांसोबत त्यांचा आदर्श ठेवणाऱ्या कलाकार मंडळींनीही सुलोचना दीदींना आदरांजली वाहिली. (Sulochana Latkar Passes Away)
यांत अभिनेता मिलिंद गवळी यांनी सुलोचना दीदींसोबतचा फोटो शेअर करत उत्तम असं कॅप्शन त्याखाली देत पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, सई ताम्हणकर, समृद्धी केळकर, रुपाली भोसले, रसिका वेंगुर्लेकर, जुई गडकरी. गौरी किरण, प्रिया बापट या कलाकार मंडळींनी सुलोचना दीदी यांना फोटो शेअर करत आदरांजली वाहिली आहे.
मराठी चित्रपटसृष्टी आपल्या सोज्वळ सौंदर्याने आणि उत्तम अभिनयाने बहारदार करणाऱ्या सुलोचना दीदी यांच्या आत्म्यास शांती लाभो.