‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरांत पोहोचल्या. मात्र या कार्यक्रमातून एक्झिट घेतल्यानंतर त्या सध्या शुभविवाह या मालिकेतून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहेत. विशाखा यांचं मालिकेत नकारात्मक पात्र पाहायला मिळत आहे. विशाखा यांनी आजवर नाटक, चित्रपट व मालिका यांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावरही विशाखा बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही नेहमीच अपडेट देताना दिसतात. (Vishakha Subhedar Wedding Anniversary)
नुकताच विशाखा यांचा लग्नाचा वाढदिवस पार पडला. त्यांच्या लेकाने याबाबतची खास पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आई-बाबांचा एकमेकांना केक भरवतानाचा फोटो पोस्ट केला आहे. ‘हॅपी अनिव्हर्सरी गोंडस कपल’ असं कॅप्शन देत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. विशाखा यांच्या लव्हस्टोरीबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल. लहान वयात लग्न करुन अत्यंत कष्टाचे दिवस पार पाडत विशाखा यांनी इतकी वर्ष त्यांचा संसार सांभाळला. यावेळी त्यांच्या पतीचीही मोलाची साथ त्यांना मिळाली.

‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत विशाखा यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबाबत खुलासाही केला. त्या म्हणाल्या होत्या की, “माझ्या नवऱ्याला मी आधी दादा म्हणायचे. त्यामुळे आमची जेव्हा ओळख झाली तेव्हा तो महेश दादा होता. चांगली ओळख झाल्यानंतर तोच मला बोलला की मला दादा म्हणू नको. त्यादरम्यान मी अगदी लहान होते. तो असं का म्हणतो? हे मला कळंतच नव्हतं”.
विशाखा व महेश यांच्या लग्नाला त्यांच्या घरुन विरोध होता. इतकंच नव्हेतर नाटकांत काम केलेलंही त्यांच्या बाबांना आवडत नसे. यावर विशाखा म्हणाल्या, “आजीने समजवल्यानंतर बाबांनी लग्नाला परवानगी दिली. पण माझ्या आजी-आजोबांची एक अट होती की, आम्ही आमच्या मुलीचं लग्न करुन देत आहोत पण ती टीव्हीमध्ये दिसली पाहिजे.आणि माझ्या नवऱ्यानेही आजी-आजोबांना दिलेला शब्द पूर्ण केला. मात्र घरी माझ्या नात्याबाबत कळताच आई पंधरा दिवस बोलत नव्हती. मग घरी मला कोंडूनही ठेवलं. चाळीशी गाठल्यानंतर कळतं की, तेव्हा आपण किती बालिश होतो. २० ते २१व्या वर्षामध्येच लग्न झालं”.